Breaking News
सध्या तीव्र उन्हाळा सुरू आहे गरमीने अंगाची लाही लाही होत आहे. उष्णतेच्या लाटांनी नागरिक बेजार झाले असून प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. गरमीने हवालदील झालेले नागरिक उसाचा रस, नारळ पाणी, लिंबू सरबत, शीतपेयांच्या माध्यमातून उकाड्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवाची काहीली होत असताना अशातच जर थंडगार बर्फाचा गोळा मिळाला तर..... अन त्यातही तो आईस्क्रीम गोळा असेल तर... एखाद्याला हे अनुभवताना क्षणार्धात हायसे वाटले नाही तर नवलच. बर्फाचा गोळा खायची एक वेगळीच मज्जा आहे. लहानपणापासून जवळजवळ प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतला आहे. काला खट्टा तर प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. आज आपण असे ठिकाण पाहूया की जिथे काला खट्टा तर मिळतोच पण त्याचबरोबर बर्फाच्या गोळ्याचे विविध प्रकार अनुभवून मनशांती होते. 2003 साली शंकरलाल जाट यांनी वाशी, सेक्टर 15 येथील बालाजी सदन येथे सुरू केलेले 'अचीजा डिश गोळा सेंटर' येथे येणाऱ्या ग्राहकांची गोळ्याची भुख 20 वर्षांपासून भागवत आहे. दोन कारागिरांच्या माध्यमातून दुपारी 1 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत येथे ग्राहक सेवा सुरू असते. या ठिकाणी आपणाला काला कट्टा सोबत जास्त खप असणाऱ्या आईस्क्रीम गोळा, ऑरेंज मलाई गोळा, ड्रायफूट गोळा तसेच फालुदा ही मिळतो. स्पेशल गोळा असणाऱ्या आईस्क्रीम गोळा आणि मलाई गोळा खाण्यासाठी ग्राहकांची येथे झुंबड असते. मलाई गोळा बनविण्यासाठी लागणारी रबडी आणि रंगीबेरंगी चासणी ते स्वतः बनवतात. मलाई गोळा बनवण्यासाठी रबडी, मावा, सुकामेवा तसेच साखरेची चासणी वापरली जाते. तर बर्फाचा गोळा बनवून त्यात आईस्क्रीम, रबडी, मावा, सुकामेवा आणि रंगीन चासणी वापरून आईस्क्रीम गोळा बनवला जातो. बर्फाचे गोळा बनवत असताना तो बघण्याचीही एक वेगळी मज्जा आहे. मोठ्यांच्याही मनातलं लहान मूल ते डोळा भरून पाहत असतं. डिश गोळा प्रकाराचा आनंद लुटण्यासाठी दिवसभरामध्ये सुमारे 200 ते 250 गोळा प्रेमी ग्राहक इथे येत असतात. तुम्हालाही वेगवेगळे गोळा खाण्याची इच्छा असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर दुपारी 1 ते रात्री 11.30 या वेळेत इथे यावे लागेल. सोशल मीडियावर हे ठिकाण तितके प्रसिद्ध नसले तरी दुकानावर खवय्यांची मात्र रेलचेल असते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे