Breaking News
पुढील पाच वर्षात संपुर्ण काम नव्याने करण्याची गरज
नवी मुंबई ः महापालिकेने 2004 साली 221 कोटी रुपये खर्च करुन मोरबे जलवाहिनी कार्यान्वित केली होती. परंतु, गेल्या काही महिन्यात या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागत असल्याने त्याचा फटका शहरातील पाणीपुरवठ्याला बसत आहे. पालिका अधिकारी, ठेकेदार व राजकारणी यांच्या ‘प्रतिभा'वान कामामुळे ही जलवाहिनी वेळेआधीच बदलण्याची गरज असल्याची चर्चा नवी मुंबईत आहे. त्यामुळे सदोष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
पालिकेने मोरबे धरण 2003 साली ताब्यात घेतल्यानंतर मोरबे येथून नवी मुंबई शहरात पाणी आणण्यासाठी 221 कोटी रुपये खर्च केले होते. हे काम डिफर्ड पेमेंट पद्धतीने प्रतिभा इंडस्ट्रिज लि. यांना देण्यात आले होते. मोरबे धरणातून पाण्याची वाहतूक बेलापुर सेक्टर 25 येथील पंप स्टेशन येथे करुन तेथून ते लिफ्ट करुन पारसिक हिलवर बांधण्यात आलेल्या एमबीआर मध्ये नेण्याचे प्रयोजन या कामात होते. नंतर या एमबीआरमधून सदर पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने संपुर्ण शहरात पोहचविण्याचे नियोजन या योजनेत होते. यामुळे शहरातील निरनिराळ्या नोड्स मधील ईएसआर मध्ये पाणी आपोआप भरले जाणार होते.
या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या आराखन्यात ती डब्बल ए क्लास युक्त असावी अशी अट निविदेत होती. त्याचबरोबर सदर वाहिनीवर रबर कोटींग असावे अशी अटही होती. काम पुर्ण झाल्यावर या जलवाहिनीची चाचणी 8 किलो प्रति मीटर क्षमतेने करण्याचेही नमुद होते. नवी मुंबई शहर हे खाडीकिनारी असून लोखंड गंजण्याचे प्रमाण इतर भागांपेक्षा जास्त असल्याने निविदा बनवताना या तांत्रिक बाबींची दखल घेण्यात आली होती. परंतु, ठेकेदाराने याबाबत आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पुर्तता न करता सदर जलवाहिनी तशीच कार्यान्वित केल्याने आज 15 वर्षातच सदर जलवाहिनीला जागोजागी तडे जात असल्याचे बोलले जात आहे.
मोरबे ते कळंबोली ही जलवाहिनी खाडीप्रवण क्षेत्रातून जात असल्याने पालिकेने ती लवकरात लवकर बदलण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. सल्लागार नेमूण त्याबाबत पुढील योजना आखण्याचे काम पालिकेत सुरु असल्याचे सुत्रांकडून कळत आहे. ही जलवाहिनी लवकरात लवकर न बदलल्यास तिला वारंवार तडे जावून पाण्याच्या ऱ्हासाबरोबर जनतेच्याही प्रकोपाला सामोरे जावे लागेल या जाणिवेने पालिका शहर अभियंता विभाग कामाला लागल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai