आयुक्तांनी केली नवी मुंबई क्षेत्र पाहणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 30, 2023
- 377
नवी मुंबई ः पावसाळा सुरु झाल्यापासून त्याची संततधार सुरुच आहे. बुधवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत होते. या कालावधीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई पालिका क्षेत्रात ठिकठिकाणी भेटी देऊन विशेषत्वाने पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांची संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
23 जूनला मोठ्या प्रमाणात पावसास सुरूवात झाल्यानंतर आयुक्तांनी लगेचच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्र आणि विभाग कार्यालये व अग्निशमन केंद्रे येथील आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी आयुक्तांनी सीबीडी सेक्टर 6 मलउदंचन केंद्र व मार्केट परिसर, हर्डिलिआ कंपनीजवळील सायन पनवेल महामार्गाखालून जाणारा नाला व सानपाडा परिसर, सेक्टर 17 वाशी-तुर्भे नाला अरेंजा कॉर्नर परिसर, वाशीतील सेक्टर 4, 5, 6 व 9 चा परिसर, तुर्भे सेक्टर 21 परिसर अशा विविध ठिकाणी भेटी देत सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
सायन पनवेल महामार्गावरून वाशी सेक्टर 7 कडे उतरण्याच्या रस्त्यावर रविवारच्या जोरदार पावसात पाणी साचल्याने त्या ठिकाणी त्वरित चर खोदून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यात आली होती. त्या भागाची आयुक्तांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे वाशी सेक्टर 5 येथे एफ 1 टाईपच्या इमारतींसमोरील गटारावरील स्लॅब रविवारी कोसळला होता. सदर काम पावसाची काहीशी उघडीप मिळाल्यानंतर तत्परतेने करण्याचे निर्देशित केले. तोपर्यंत तो पदपथ जाण्यायेण्यासाठी पूर्णपणे बंद करून काळजी घेण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. या पाहणी दौऱ्यात सेक्टर 9 येथील व्यापारी वर्गाने मागील 4 दिवसात सतत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळूनही त्याठिकाणी पावसाळ्यापूर्वी बांधलेल्या कल्व्हर्टमुळे यावर्षी पाणी साचून राहिले नाही त्याबद्दल आभार व्यक्त केले. अशाच प्रकारे अनेक ठिकाणांवर अभियांत्रिकी विभागाने इलाज काढलेला आहे. पाणी साचण्याच्या संभाव्य 14 ठिकाणी उपाययोजना शोधाव्यात असे आयुक्तांनी सूचित केले. पालिकेच्या वतीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून सर्व यंत्रणा सतर्क आहेत. नागरिकांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी नजिकच्या विभाग कार्यालयास अथवा महापालिका मुख्यालयातील तात्काळ कृती केंद्रास संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai