राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा पलटवार
- by संजयकुमार सुर्वे
- Jul 07, 2023
- 608
अजित पवार, वळसे पाटील, भुजबळांसह शपथ घेतलेल्या 9 आमदारांचे निलंबन
मुंबई ः देशाच्या राजकारणात तेल लावलेला पेहलवान म्हणून शरद पवार ओळखले जातात. यावेळी पुतणे अजित पवार यांनी त्यांच्याविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. शरद पवार यांनी राजकीय चातुर्य दाखवत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत बोलावून अजित पवारांसह शपथ घेतलेल्या 9 जणांना पक्षातून निलंबित केले. त्यामुळे निलंबित झालेला पदाधिकारी पक्षावर दावा ठोकू शकतो का? हा प्रश्न केंद्रिय निवडणुक आयोगापुढे उपस्थित झाला आहे. स्वतःला चाणक्य समजणाऱ्यांना मोठी चपराक त्यांनी या खेळीने दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अजित पवार यांच्यावर भाजपने 2014 च्या निवडणुकीदरम्यान 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला होता. त्यावेळी प्रचारादरम्यान फडणवीस यांनी आपले सरकार आल्यावर अजित दादा चक्की पिसींग म्हणत त्यांना तुरुंगात टाकणार असल्याचे सांगितले होते. याच आरोपांची उजळणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशमधील जनसभेला संबोधीत करताना केली. यावेळी त्यांनी सिंचन घोटाळा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा उल्लेख करत 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना जेरबंद करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याला घाबरुन अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा देशात आहे. यापुर्वी अशाच पद्धतीने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना गळाला लावल्याचे बोलले जाते.
अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसेपाटील, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अन्नाम, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी शपथ घेतली. यापैकी हसन मुश्रीफ यांच्यावर प्रवर्तन निर्देशनालयाने अनेक धाडी टाकल्या आहेत. तर छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तुरुंगात जावे लागले होते. इतरही 8 जण ईडीच्या रडारवर असल्याचे बोलले जात होते. बंडखोरीनंतर अजित पवार यांनी तातडीने वर्किंग कमिटीची बैठक बोलावून आपली नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी केंद्रिय निवडणुक आयोगाकडे दावा ठोकला आहे. शरद पवार यांनी आपण कोणतीही कायदेशीर लढाई लढणार नसून आपण जनतेच्या दरबारात जावू असे सांगून पवार गटाची दिशाभूल केल्याचे दिसत आहे. अजित पवार यांच्या दाव्याआधी त्यांनी निवडणुक आयोगाकडे कॅव्हेट दाखल करुन कायदेशीर लढाईसाठी आपण तयार असल्याचा संदेश दिला.
शरद पवार यांनी यापुर्वीच शपथ घेतलेल्या 9 जणांची आमदारकी रद्द व्हावी म्हणून सभापती राहूल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. एवढ्यावरच ते थांबले नसून दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून अजित पवारांसह 9 आमदारांना पक्षातून निलंबित केले. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 25 सदस्यापैकी 22 सदस्य उपस्थित असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. पवारांच्या या निर्णयामुळे अजितदादांना पक्षचिन्ह व पक्षाच्या नावावर आता दावा ठोकता येणार नसल्याचे मत अनेक घटनातज्ञ व्यक्त करत आहेत. पवारांनी एकाच खेळीने 9 जणांचा राजकीय बळी तर घेतलाच त्याचबरोबर उर्वरित बंडखोरांना परतीचे दरवाजे उघडे ठेवल्याचा संदेश दिला आहे. पवारांच्या या राजकीय चलाखीने देशातील तथाकथित चाणक्यांना चांगलाच दणका बसल्याचे बोलले जात आहे.
- राष्ट्रीय समितीचा निर्णय अंतिम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत राष्ट्रीय समिती, कार्यसमिती, राज्यसमिती, केंद्रशासित प्रदेश समिती, प्रादेशिक समिती तसेच जिल्हासमिती अशाप्रकारच्या समित्या आहेत. त्यामध्ये कार्यसमितीला अनेक अधिकार प्रदान केले आहेत ज्यामध्ये अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर किंवा मृत्यूनंतर प्रभारी अध्यक्ष निवडण्याचे अधिकार अनुसूची 20 मधील पोटकलम 8 अन्वये आहेत. अतिशय विशेष परिस्थितीत पक्षाच्या भल्यासाठी कार्यसमिती योग्य निर्णय घेवू शकते, परंतु हा निर्णय सहा महिन्यांत राष्ट्रीय समितीला कळवणे बंधनकारक आहे. परंतु,पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रीय समिती ही सर्वोच्च असून त्यांचा निर्णय हा अंतिम आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय समितीचा निर्णय बंधनकारक असल्याचे बोलले जात आहे. - सेनेच्या बंडखोरीतून धडा
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षातील महत्वाच्या समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या मताची जाणिव पवार यांना झाली होती. सदर समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या मतावर बंडखोर पक्ष आणि चिन्ह यावर दावा करु शकतात हे चाणाक्ष शरद पवार यांनी वेळीच हेरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या होत्या. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीचा प्रत्येय पवार यांच्या वरील निर्णयावरुन येत आहे. त्यावेळच्या निर्णयाचा मोठा लाभ त्यांना यावेळच्या राजकीय लढाईत होणार असल्याचे बोलले जात आहे. - मुख्यमंत्री होण्यास दादांना अडसर?
अजित पवार यांनी केलेली बंडखोरी ही मुख्यमंत्रीपदासाठी केली असल्याचे बोलले जात आहे. परंतु दादांच्या शपथविधीनंतर सक्तवसूली संचालनालयाने न्यायालयात जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी आरोप पत्र दाखल केले आहे. त्यात अजित पवार व त्यांचे निकटवर्तीय संचालक असलेल्या कंपन्यांनी सदर मालमत्तेवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अन्य बँकांकडून 826 कोटी रूपयांची कर्जे दिली व नंतर याच मालमत्ता अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी कवडीमोल भावात विकत घेतल्याचे निरिक्षण न्या. देशपांडे यांनी आरोपपत्राची दखल घेताना हा मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. दादांचा शपथविधी आणि त्याचवेळी ईडीने दाखल केलेले आरोपपत्र हा प्रयोग आहे की संयोग असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे आरोपपत्र दाखल करून दादांची मुख्यमंत्रीपदासाठी सौदेबाजीची धार कमी केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात रंगली आहे.
- बंडखोरांचे नाथ होणार अनाथ
अजितदादा कामांसाठी निधी देत नाहीत तसेच ते शिवसेना संपवायला निघालेत म्हणून बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी बंडखोरी केल्याचे एकनाथ शिंदे म्हणत होते. आता अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार असल्याने बाळासाहेबांच्या विचारांचे काय? हा प्रश्न सध्या शिंदेंसोबत गेलेल्या शिवसैनिकांना पडला आहे. 30 ऑगस्टपुर्वी शिंदेंसह बंडखोरांचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात मंत्रालयात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद गेल्यास बंडखोरांचे नाथच अनाथ होणार असल्याने शिंदेसेना धास्तावली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे