तळा तालुक्यात सात गावे दरडीच्या छायेत
- by मोना माळी-सणस
- Jul 27, 2023
- 2087
103 कुटुंबातील 321 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतरण
तळा ः इरशाळवाडीत दरड कोसळून क्षणांत गाव होत्याचे नव्हते झाले. राज्यात अशी अनेक क्षेत्र, गावे, वसाहती दरडीच्या छायेत आहेत. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात एकूण 7 गावे दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यातील 103 कुटुंबातील 321 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतरण प्रशासनाने केले आहे. आपत्ती संदर्भात जनजागृतीवर भर देण्यात येत असून संबधित गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
इरशाळवाडी दुर्घटनेनंतर जाग आलेल्या सरकारने राज्यातील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. दरड कोसळल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्याआधीच काय काळजी घेता येईल यासाठी प्रशासनाची चाचपणी सुरु झाली आहे. तळा तालुक्यात एकुण 7 गावांना दरडीचा धोका असल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. यातील भुवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनुसार गिरणे आणि पुसाटी ही दोन गावे दरडप्रवण असून स्थानिक प्रशासनाने केलेल्या पाहणीत जोगवाडी, पिटसई कडक्याची गाणी, चरई बुद्रुक, रोवळा खोंड, बेलघर, ही गावे दरडप्रवण म्हणून जाहीर केली आहेत. या सर्व गावांना सुरक्षित राहण्याच्या सूचना केल्या असून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या गावातील दरडीचा जास्त धोका असणाऱ्या एकूण 103 कुटुंबांतील 321 नागरिकांना स्थानिक प्रशासनामार्फत तात्पुरत्या निवारा केंद्रात जसे की समाजमंदिरे, सभागृह, फार्म हाऊस, शाळा, मंदिर परिसर याठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासाठी शिवभोजन थाळीची सोय करण्यात आली आहे. तहसीलदार स्वाती पाटील यांच्या आधिपत्याखाली संबंधित कुटुंबांच्या आणि गावांच्या सुरक्षिततेसाठी कार्यवाही सुरु असून नायब तहसीलदार सुरेखा घुगे, ग्रामसेवक, तलाठी, तळा पोलिस, गावचे पोलिस पाटील यांच्यासमवेत गावांना भेट दिली जात आहे. ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
- आमचे इरशाळवाडी, माळीण होण्याची वाट पाहताय का?
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सूमारे 800 लोकवस्तीच्या मौजे गिरणे येथे सन 2007 मध्येही दरड कोसळली होती. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र 15 वर्षे प्रशासनाने गावाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच ठोस उपाययोजना, पुनर्वसन किंवा स्थलांतरण न केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. तेव्हापासून केवळ मतदान प्रचाराचा भाग सोडला तर या धोकादायक गावाच्या सुरक्षिततच्या प्रश्नासाठी ना राजकीय नेता येथे आला ना शासनाचे अधिकारी. मात्र कोणताच पर्याय नसल्याने दरडीच्या छायेतच जीव मुठीत घेऊन ग्रामस्थ वास्तव करत आहेत. आता इरशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर या गावाची नुकतीच पाहणी करण्यात आली. भुवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनुसार गिरणे गाव पुन्हा एकदा दरडप्रवण जाहीर झाले आहे. मात्र केवळ पाहणी, आश्वासने आणि नोटीस यापलिकडे प्रशासन काहीच करत नसल्याची खंत वर्षानुवर्ष दरडीच्या छायेत राहणाऱ्या गिरणे ग्रामस्थांनी केली आहे. आतातरी शासन आमच्या सुरक्षिततेसाठी कायम स्वरुपाची उपाययोजना करणार की तात्पुरती उपाययोजना करुन आजचे मरण उद्यावर ढकलून आमचेही तळीये, इरशाळवाडी होण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यातील एकुण सात गावे दरडप्रवण असून संबंधित कुटुंबाना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित गावांची पाहणी करुन त्यांना सर्तकतेच्या सूचना दिल्या आहेत. ही तात्पुरती उपाययोजना असली तरी कायमस्वरुपी काय उपाययोजना करता येईल त्याची चाचपणी सुरु असून तसा प्रस्ताव बनविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. - नायब तहसीलदार सुरेखा घुगे
दडरप्रवण गावे स्थलांतरीत कुटुंब
- पुसाटी 11
- गिरणे 15
- जोगवाडी 23
- बेलघर 7
- पिटसई कडक्याची गाणी 19
- चरई बुद्रुक 15
- रोवळा खोंड 13
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस