दिव्यांगांच्या मागण्या पूर्णत्वास न्या

दिव्यांग कृती समितीचे साकडे

नवी मुंबई : जागतिक अपंग दिनानिमित्त  नवी मुंबईतील दिव्यांग कृती समिती व नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समिती यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दिव्यांग कृती समितीचे अध्यक्ष शंकर पडूळकर यांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार मंदा म्हात्रे यांना देऊन त्यांचे निराकरण करण्याचे साकडे घातले.

आ. मंदा म्हात्रे यांनी सदर दिव्यांगांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या. म्हात्रे यांनी सांगितले कि, जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांच्या मागण्यांसाठी स्वतः दिव्यांग रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत, हि नवी मुंबई सारख्या विकसित शहरात अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यांनी महापालिकेमध्ये 5% राखीव निधी उपलब्ध करणे, 40 वर्षावरील दिव्यांगांना मासिक 5 हजार अनुदान, एक दिव्यांग एक स्टॉल,शहरी घरकुल, दिव्यांग संस्थांना स्वच्छता गृहे, पालिका रुग्णालयात मोफत उपचार, मोफत आरोग्य विमा, अर्थसहाय्य, अपंगांचे सर्वेक्षण, स्वयं रोजगारासाठी स्टॉल उपलब्ध करणे अशा रास्त मागण्या केल्या असून सदर मागण्या सोडविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. सदर दिव्यांग ही आपली संपत्ती असून त्यांच्या पाठीशी मी सदैव उभी असून त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी सुरेश ठाकूर, शंकर पडूळकर, बाळकृष्ण खोपडे, चौगुले, सुरज कांबळे, चंद्रशेखर चौधरी उपस्थित होते.