राधेय तेव्हा कुठे गेला तुझा धर्म....
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2023
- 461
भारतीय लोकशाहीचे चार खांब केव्हाच खिळखिळे झाले आहेत. अन्याय झालेल्या व्यक्तीला वेळेवर न्याय मिळेलच यावर जसा न्यायालयावर भरवसा राहिलेला नाही तसं प्रशासन जनहितार्थ काम करेल यावरही कोणाचा विश्वास नाही. सरकार आपमतलबी झाल्यावर शासनाकडूनही न्यायाची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. एका स्तंभाकडून या अपेक्षा पूर्ण होतील, अशी धारणा आह पण पत्रकारितेत घुसलेल्या अपप्रवृत्तीने या स्तंभाचेही धिंडवडे निघालेत. अखेरचं अस्त्र म्हणून लोकं प्रसार माध्यमांकडे अपेक्षेने पाहत आहेत. पण काही अपवाद वगळता या माध्यमांची लेखणीही म्यान झालेली पाहण्याचं दुर्भाग्य जनतेच्या नशिबी आलंय. लोकशाहीची खिल्ली उडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे अपेक्षित असताना ज्यांच्या हाती पेन आहे तेच बोरूबहाद्दर बनले. सत्ताधारी जेव्हा मदमस्त होतात तेव्हा विरोधाची भूमिका प्रसार माध्यमांनी घेतली पाहिजे, असं लोकशाहीला अपेक्षित आहे. जेव्हा विरोधक कमजोर ठरतात तेव्हा माध्यमांनी बुध्दीजीवी लोकांनी जनतेला मार्गदर्शन केलं पाहिजे. मदमस्थ सत्तेला रोखण्याचं लोकशाहीतील प्रसार माध्यम एकमेव हत्यार आहे.
वेळ प्रसंगी सत्तेवर न्याय व्यवस्थेने डोळे वटारले पाहिजेत. यापूर्वी न्यायालयाने झापलं की सत्ता सरळ मार्गी चालायची. काँग्रेसने शहाबानो प्रकरणात तिला वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा याच स्तंभाने सत्तेला असं काही झोडलं की अखेर सत्ताच गमवावी लागली. आज तशी परिस्थिती देशात नाही. न्यायालयाने डोळे वटारताच थेट सरन्यायाधिशांच्या अधिकारावरही गदा आणण्याचा प्रयोग केला जातो. आपल्याला अपेक्षित निर्णय देणाऱ्यांना राज्यपाल, खासदार वा एखाद्या देशाच्या राजदूताचं बक्षीस दिलं जातं. अशावेळी लोकशाहीचा चौथास्थंभ म्हणून ज्यांच्याकडून अपेक्षा असते तेच आपल्या कर्तव्याशी अप्रामाणिक झाले तर लोकशाहीची अर्थी निघाली म्हणून समजा.
हा प्रश्न ऐरणीवर आला कारण ‘इंडिया'ने वृत्त वाहिन्यांच्या 14 अँकरविरोधात पुकारलेल्या असहकार चळवळीने. त्यांच्या सरंक्षणासाठी भाजपचे नेते व प्रवक्ते लोकशाहीची महती गात आहेत. या 14 जणांनी पत्रकारितेच्या नावाखाली काय प्रताप केले ते खर तर कोणीही सांगण्याची गरज नाही. पण या निमित्ताने भाजप ज्या लोकशाहीचे गोडवे गात आहे त्याने देशातील लोकशाही मूल्यांची, सरकारी यंत्रणांची, माध्यमांची काय अवस्था केली याचा विचार केला तरी शहारून येत. ‘रिपोर्ट्स सॅन्स फ्रंटियर्स' ही संस्था जागतिक स्तरावर प्रसार मध्यमांचं त्या-त्या देशातील स्थान मोजत असते. बिल्कीस बानो प्रकरणात बाहेर आलेल्या आरोपींविषयी माध्यमांनी केलेल्या टिपण्णीनंतर या संस्थेने माध्यमांच्या स्वातंत्र्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. माध्यम स्वातंत्र्याच्या निर्देशांकात जगभरातील 180 देशांचा समावेश ही संस्था करते. लोकशाहीचा बडेजाव करणाऱ्या भाजपच्या डोळ्यात अंजन भरेल असे आकडे फ्रंटियर्सने जारी केलेत. त्यात भारत 161व्या स्थानावर आहे. लोकशाहीचा स्थंभ म्हणवून मिरवणाऱ्यांच्या थोबाडीत मारणारी ही आकडेवारी आहे. ‘इंडिया'ने ज्यां पत्रकारांबाबत असहकार पुकारला तसे पत्रकार जर या क्षेत्रात असतील तर भारतीय पत्रकारिता शेवटून पहिला नंबर निश्चित मिळवेल हे सांगायला कोणत्याही संस्थेची गरज नाही.
कोणीही पत्रकारांवर किंवा त्यांच्या माध्यमांवर बहिष्कार टाकणं हे कदापि योग्य नाही. पण इतक्या टोकाचा जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा ही माणसं कोणाची तरी ओझी वाहत असतात असाच अर्थ निघतो. भाजपच्या सत्तेसाठी हे 14 जण किती बोरूबहाद्दर बनले आहेत, हे जग पहात होत. लोकंही त्यांची थट्टा उडवत असून अनेक वेळा त्यांची धिंड काढण्याचे प्रसंग आलेले आहेत. अशावेळी त्यांच्या मालकांनीच खरंतर असल्या विकाऊ पत्रकारांना रोखलं पाहिजे. पण ते करणार नाहीत. वाहिन्यांची मालकी ही केवळ सत्तेची गुलाम बनते तेव्हा त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा नसते. इथे तर 28 पक्षांच्या आघाडीने थेट बहिष्कार घालूनही अँकर तिथेच असेल तर त्याची सत्तेला आणि वाहिनीच्या मालकाला असलेली गरज अधोरेखित होते. मग लोकशाहीचे बारा वाजले तरी या मंडळींना काहीही पडलेलं नसतं. हे पत्रकार जेव्हा लोकशाहीसाठी आणि पत्रकारितेला मारक ठरतात तेव्हा त्यांना खड्यासारखं दूर करायला हवे पण ईडी-सीबीआयच्या भीतीने मालकांकडून हे होणारही नाही.
वृत्त वाहिन्यांच्या 14 अँकर्सवर ‘इंडिया'ने बहिष्कार घातल्यापासून भाजपच्या प्रवक्त्यांच लोकशाहीवरील प्रेम उचंबळून आलं आहे. हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे अश्रू ढाळत आहेत. याच लोकशाहीवरील प्रेमामुळे 2014 नंतर किती पत्रकारांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या, त्यांना कसा मानसिक त्रास दिला गेला, आयटी सेलद्वारे त्यांची कशी निंदानालस्थी केली याची माहिती प्रवक्त्यांनी घेतल्यास त्यांचं लोकशाहीवरील प्रेम हे पुतना मावशीच प्रेम ठरेल. पुण्यप्रसून वाजपेयी,अभिसार शर्मा यांनी नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात' या कार्यक्रमाची पोलखोल केल्यानंतर या दोघांना जगणं कसं मुष्कील केलं, स्टार वाहिनीचं प्रसारण कसं बंद पाडलं, अखेर दोघांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या हे सर्वश्रुत आहे. अशुतोष, राजदिप सरदेसाई, अजित अंजूम, निखिल वागळे यांच्यासारखे पत्रकार जड झाल्यावर वाहिन्याच विकत घेण्यात आल्या. थेट उद्योगपतींना वाहिन्या कशा विकत घ्यायला लावल्या सुरस कथा हा वेगळा विषय ठरेल. रविश कुमार यांच्यासारख्या पत्रकाराला घरी बसवण्यासाठी चॅनलची मालकी आदानी यांनी घेणं हे कशाचं द्योतक? आज ज्यांच्याविरोधात बहिष्काराचं हत्यार उपसलं त्यातील किती जणांनी तेव्हा या पत्रकारांची बाजू तेव्हा घेतली होती? कारण त्यांची निष्ठा सत्तेशी आणि सत्तेसाठी इमान विकणाऱ्यांशी होती.
जे 14 जण इंडियाच्या बहिष्काराचे धनी झालेत ते आता आपल्या समर्थकांना बोलवून आपण कसे योग्य होतो, हे सांगण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहेत. टीव्ही एडिटर्स या संघटनेने बैठक घेऊन विरोधकांचा तोंड दाबण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा कांगावा सुरु केला आहे. असंख्य पत्रकारांवर अन्याय झाले तेव्हा ते कुठे होते, सत्तेच्या गल्लीत शेपूट हलवणाऱ्यांविरोधात कारवाई होताच संघटना ही आता शेपटी हलवू लागली आहे. सुशांत सिन्हाने आता मोठमोठी व्याख्याने सुरू केलीत. अखलाखला गो हत्येमुळे दिवसाढवळ्या ठार मारलं तेव्हा तो कुठे होता? कठूआच्या निष्पाप बालिकेवर पुजाऱ्यासह पोलिसांनी अत्याचार केला व त्यांच्या समर्थनार्थ जम्मूचे वकील हिंदुत्वाचा नारा देत रस्त्यावर उतरले तेव्हा हा राधेय कुठे होता? ज्याच्यावर बहिष्काराचं हत्यार उपसलं त्या सुधीर चौधरी याची मंत्री असलेल्या स्मृती इराणी या बाईंनी भर लाईव्ह मुलाखतीत बेईज्जती केली तेव्हा संगठना कुठे होती? रुबीया लियाकत ही प्रश्नापासून पळण्याचं आरोप विरोधकांवर करते. प्रश्न कोणाला विचारायचे इतकी समाज नसलेली ही अँकर म्हणून कोणाची जबाबदारी हाकत आहे. तिच्या चॅनेलचा मालक जगदीश चंद्र आपल्या वाहिनीची प्राथमिकता ही मोदी आहे, असं खुलेआम सांगत असेल तर रुबीका काय करणार? अशोक श्रीवास्तवला त्याच्या वडिलांच्या आणिबाणीतील पत्रकारितेची आठवण होत आहे. अमन चोप्रा याला बहिष्कार म्हणजे गर्व वाटू लागला आहे. राजस्थानात दंगे व्हावेत म्हणून याच माणसाने आपली पत्रकारिता गहाण ठेवली होती. या चोप्रावर राजस्थान सरकारने गुन्हा दाखल केला आहे. अर्णव नावाचा आणखी एक विदुषक देशातील जनता माझ्याबरोबर आहे, असं सांगतो आहे. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी गळा काढणारे राफेल घोटाळा झाला तेव्हा कुठे होते? पुलवामात देशाच्या 40 वीर शाहिद झाले तेेव्हा सरकारला सवाल विचारावं असं का वाटलं नाही? त्यामुळे म्हणावे लागते राधेय तेव्हा कुठे गेला तुझा धर्म....
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai