150 कुटुंबांना तात्पुरता निवार्‍याचा मार्ग मोकळा

नवी मुंबई ः धोकादायक संक्रमण शिबिरात राहणार्‍या जवळपास 150 कुटुंबीयांना अखेर तात्पुरता निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाशी सेक्टर-9 व 10 मधील धोकादायक इमारतीतील आवारात असलेल्या मोकळ्या भूखंडावर घरे बांधण्याला महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी मान्यता दिली आहे. 

नवी मुंबईत वाशीसह अन्य विभागात सिडकोने 40 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधली होती. यात वाशीतील जेएन-1, जेएन-2, सेक्टर-9 व 10 येथील घरांचा समावेश आहे. अवघ्या 20 ते 25 वर्षांत वाशीतील घरे व इमारती अत्यंत धोकादायक झाल्या. 1995पासून या इमारतींना वाढीव चटई क्षेत्र देऊन त्याची पुर्नबांधणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान काही घरांचे छत पडल्याच्या घटना घडल्यामुळे सुमारे 150 कुटुंबीयांना जुईनगर येथील संक्रमण शिबिरात हलविण्यात आले.

गेल्या वर्षापासून धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी निर्माण झालेल्या प्रश्नावर न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम किशोर पाटकर यांनी केले. त्यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर तब्बल 20 वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणार्‍या नागरिकांचे चांगल्या घरांचे स्वप्न साकार होत असताना संक्रमण शिबिरातील घरेदेखील धोकादायक स्थितीत आल्याने त्यांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सेक्टर-9 व 10मधील भूखंडावर तात्पुरते संक्रमण शिबीर निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवला होता. सत्ताधारी राष्ट्रवादीने प्रशासनाचा प्रस्ताव बहुमतांच्या जोरावर फेटाळून लावल्याने पुन्हा या कुटुंबीयांचा निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर किशोर पाटकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे वाशी सेक्टर-9 व 10 मधील धोकादायक इमारतीतील आवारात असलेल्या मोकळ्या भूखंडावर घरे बांधण्याला महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी मान्यता दिली.