अग्निपंखचे अभिवाचन करून विद्यार्थ्यांची डॉ. कलाम यांना वाचनांजली
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2023
- 230
नवी मुंबई ः मिसाईल मॅन म्हणून सुपरिचित असणारे नामांकित थोर शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील 6 विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी आत्मचरित्र अग्निपंख या पुस्तकातील दोन भागांचे अभिवाचन करीत आगळ्या वेगळ्या पध्दतीने वाचनांजली अर्पण केली.
वाचन प्रेरणा दिनी आयोजित या अभिनव उपक्रमामध्ये नमुंमपा शाळा क्र. 117 दिवाळेगाव येथील कावेरी राठोड, किमया कोळी, तन्मय कोळी तसेच नमुंमपा शाळा क्र.101 शिरवणे येथील मुस्कान अन्सारी, गोपाल गोस्वामी, प्रियंका नेटके या 6 विद्यार्थ्यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रामधील जडणघडण या पहिल्या प्रकरणातील दोन भागांचे अभिवाचन करीत डॉ. कलामांचे बालपण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण या कालावधीतील आठवणींचा पट खुला केला. डॉ अब्दुल कलामांसारखी महनीय व्यक्ती घडत जाण्याच्या वाटचालीतील अनुभवांचे वाचन हे विद्यार्थी करीत असताना श्रोते म्हणून उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांना डॉ. कलामांच्या व्यक्तिमत्वाची सुरूवातीच्या काळातील जडणघडण तर कळलीच, शिवाय पुस्तकांसारखा मित्र नाही या डॉ. कलामांच्या अनुभवसिध्द वचनाचीही प्रचिती आली. या पुस्तकाचे 2 भाग ऐकून संपूर्ण पुस्तक वाचून मिळविण्याची इच्छाही मनात उत्पन्न झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी शिक्षण विभागाचे उपआयुक्त दत्तात्रेय घनवट यांनी आवर्जुन उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांचा उत्साह वाढविला. महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.
- वाचन संस्कार करण्यासाठी नवी मुंबई आघाडीवर
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने साहित्यप्रेमी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये तेथील विद्यार्थी संख्येनुसार 250 ते 2500 पुस्तकांचे ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना प्रत्येक आठवड्याला उपलब्ध करून दिली जात असून एखाद्या विद्यार्थ्याने आठवडा पूर्ण होण्यापूर्वीच पुस्तक वाचून परत केल्यास त्यास लगेच दुसरे पुस्तक उपलब्ध करून दिले जात आहे. अशाप्रकारे महिन्याभरात जास्तीत जास्त पुस्तके वाचणा-या विद्यार्थ्यांस त्या महिन्याचा वाचनसम्राट तसेच वाचनसम्राज्ञी हा किताब मानाच्या पट्टयासह दिला जात असून त्यांचे जाहीर कौतुक केले जात आहे. अशाप्रकारे पुस्तक वाचनाचा गौरव केला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढत चालली असल्याचे अनुभवास येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai