भागवत पुराण...!
- by संजयकुमार सुर्वे
- Oct 27, 2023
- 542
उध्दव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानातून तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयावरून आपापल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. गेली अनेक वर्ष शिवसेना व आरएसएस ह्या संघटना आपल्या उपदेशाचे सोने उधळण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्ताचा वापर करतात. पण त्यात गेल्या दोन वर्षात भर पडली ती म्हणजे एकनाथ सेनेच्या भारुडाची. वर्षोत्सव असल्याने कोणी काय विचारांचे सोने उधळावे याला नियम नाहीत. यामुळे राजकीय नेते काय बोलतील, हे कोणीही सांगू शकत नाही. उध्दव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे ते सत्ताधाऱ्यांवर शरसंधान करतील, हे अपेक्षितच. शिंदेंकडे वैचारिक बैठक नसल्याने ते विरोधकांवर राजकीय विचारांची उधळण करतील हे ठरलेलंच होतं. पण अनुभवी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातून सरकारला वैचारिक दिशा मिळेल असं वाटल होतं. देशाची विस्कटलेली सामाजिक व आर्थिक विषमतेची घडी सावरण्यासाठी सरकारला कानपिचक्या देतील, देशातील अराजकतेवर बोट ठेवतील, अदानी-अंबानींच्या आर्थिक बेबंदशाहीवर प्रहार करतील, मोदी-शहांना सबुरीचा आणि सर्वसमावेशक राजकारणाचा सल्ला देतील व वेळप्रसंगी विरोधकांनाही चार गोष्टी सुनावतील, अशी अपेक्षा त्यांच्या कडून देशाला होती. संघचालक यांना त्यांच्या मातृ-पितृ संघटना पितामह म्हणून पाहतात पण हे कलियुगातील आरएसएसचे भागवतही महाभारतातील अधर्माची बाजू घेणारे भीष्मचार्य निघावे याचे वाईट वाटते.
आपल्या विजयादशमीच्या उदबोदनात त्यांनी येऊ घातलेल्या निवडणुकात प्रचाराच्या निमित्ताने देशात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल अशा वल्गना केल्या. पण हि फूट कोणत्या प्रकारे करण्याचा प्रयत्न होईल आणि तो कोण करेल हे सांगण्यास ते विसरले. खरंतर देशात जातीय राजकारण कोण करत आहे हे सांगण्यास कोणा कुरबुड्या ज्येोतिषाची मुळीच गरज नाही. बंच ऑफ इंडिया हे ज्यांच्या विचारांचे बायबल आहे त्यांनी एकजुटीचा विचार मांडावा हेही नसे थोडके. ज्यांच्या संपूर्ण सामाजिकरणाची आणि राजकारणाची भिस्त धर्माच्या ध्रुवीकरणावर अवलंबून आहे त्यांनी देशात फूट पडेल हे सांगणे म्हणजे जरा अतीच आहे. गेली पन्नास वर्ष विभाजनवादी विष लोकांच्या मनात पेरूनही हा देश एकसंध कसा किंवा एवढ्या दंगली घडूनही देशातील टिकलेले भाईचारा याचे अप्रूप सर्वानाच आहे. पण याचं श्रेय आहे ते भारतीयांच्या मनात हे विश्वची माझे घर हि भावना रुजवणाऱ्या संतांना, विचारकांना आणि होऊन गेलेल्या इतिहासकालीन निवडक राजांना.
गेली अनेक वर्ष हिंदू खतरेमे या घोषणा देण्यात आघाडीवर असलेली मंडळी अजूनही हिंदू खतरेमे आहे असं म्हणतात आणि देशात फूट पडण्याच्या गमजा मारतात यावरून हि मंडळी देशाची सत्ता सांभाळण्यास समर्थ नसल्याचे द्योतक आहे. भारतीय समाजात मुळात फूट पडली आहे ती जाती आणि वर्ण व्यवस्थेमुळे. हि व्यवस्था बदलण्यासाठी मात्र तुमच्या मातृ-पितृ संघटना काय प्रयत्न करीत आहेत ते सर्वप्रथम समाजापुढे मांडा. आजही देशातील अनेक मंदिरात वर्ण व्यवस्थेमुळे समाजातील काही घटकांना प्रवेश नाही याचे शल्य तरी तुम्हाला आहे काय? हि व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या, अंधश्रध्दा आणि रूढी परंपरेत पिचलेल्या समाजाचे उत्थान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाभोळकर, कुलबुर्गी यांच्या हत्येवर तरी तुम्ही कधी व्यक्त झालात काय? यावरून तुमच्या दुटप्पी भूमिकेचे वास्तव समोर येत. तुमच्या आरएसएस संघटनेतही कधी खालच्या समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली आहे का? त्यामुळे देश एकसंध ठेवायचा असेल आणि त्यात फूट पडायची नसेल तर भागवतजी पुराणातील वांगी पुराणात ठेवून आधी वर्णव्यवस्थेवर आघात करा. संपूर्ण समाजाला एका ध्येयात आणि एका विचारात बांधणे गरजेचे आहे. नुसते हिंदू खतरेमे अशी बांग देऊन काही काळ सत्ता मिळवाल पण त्या सत्तेची अवस्था लांडगा आला रे या कथेतील धनगराच्या पोरासारखी असेल.
गुजरातमध्ये झालेलं गोध्रा हत्याकांड त्यानंतर झालेल शिरकाण झालं यावरही व्यक्त होणं गरजेचं होत. देशातील मणिपूर हे राज्य गेली तीन महिने धगधगत असताना तुम्ही आणि पंतप्रधान शांत आहात याचा अर्थ देशाने काय घ्यायचा. मणिपूरमधील स्त्रियांची अब्रू वेशीवर टांगली तरी आपल्या मातृ-पितृ संघटनांना कंठ फुटत नाही कारण कदाचित तेथील बहुतांश समाज हा ख्रिश्चन असल्याने हे असेच घडावे अशी श्रींची इच्छा असावी. देशात पुलवामा सारखी भयंकर घटना झाली, त्याचे धागेदोरे अद्याप सापडलेले नाहीत. त्यावेळचे राज्यपाल वेगळेच सत्य सांगत आहेत. पण देशभक्त म्हणून आपण या शहिद झालेल्यांबद्दल संवेदना व्यक्त करत नाहीत आणि सरकारला जाब विचारत नाही. देशात मॉब लिंचिंगच्या शेकडो घटना घडत असताना आपण शांत राहतो त्यावेळी आपणास देशात फूट पडण्याची चिंता वाटत नाही. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ती वाटते म्हणजे आपणास देशात पडणाऱ्या फुटीची चिंता नसून मतदारांमध्ये मते देताना फूट पडू नये याची चिंता आहे.
भागवतांनी विजयादशमीच्या दिवशी व्यक्त केलेल्या विचारात सल दिसली ती विरोधकांनी भाजपसमोर ‘इंडिया' आघाडीची. मोहन भागवतांच्या आरएसएसने गेली 70 वर्ष खपवून देशात एकहाती सत्ता मिळवली होती. परंतु, मोदींविरोधी असलेली नकारात्मकता, वाढलेली महागाई व बेरोजगारी या मुद्द्यांना हात घालत विरोधकांनी एकत्रित होऊन मोंदीपुढे उभ्या केलेल्या या आव्हानाला तोंड कसं द्यायचं, हा यक्ष प्रश्न सध्या या मंडळींना पडलेला आहे. मोदी हे जरी पंतप्रधान असले तरी ते आरएसएस या संघटनेचा चेहरा आहे. आरएसएस या संघटनेने गेली अनेक वर्ष उरी बाळगलेले स्वप्न त्यांना सत्येच्या माध्यमातूनच साकारता येणे शक्य आहे. परंतु, विरोधकांच्या इंडिया आघाडीने भागवतांसह भाजपची झोप उडवली आहे. येत्या पाच राज्यांच्या निवडणुकात मोदी सत्तेत येतील किंवा नाही हे दिसणार आहे. त्यादृष्टीने भाजपची मातृ संघटना प्रयत्न करत आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता आबाधीत ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. इंडिया आघाडी या नावामुळे देशाचं नाव बदलण्यापर्यंत प्रयत्न झाले. ईडी आणि सीबीआयसारख्या स्वायत्त संस्था आज सरकारची बटीक म्हणून काम करत असून विरोधकांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे देशात फूटीरतेची बीजे आपणच रोवत आहात हे वेगळे सांगायला नको. मणिपूरच्या वांशिक दंगलीनिमित्ताने चालकांनी विजयादशमीनिमित्त अज्ञानाला वाट करून दिली हे अत्यंत दुर्देवीच होय. नऊ वर्षांपासून गुण्यागोविंदाने वावरणाऱ्यांना आताच काय झालं याचं उत्तर तिथे वाशिंकतेचं राजकारण करणाऱ्या सत्ताधारी भाजपकडून त्यांनी मागायला हवं होतं. परंतु सरसंघसंचालक याचे कारण न शोधता त्याचे खापर तेथील वांशिक वादावर फोडतात यातूनच त्यांची दुटप्पी भूमिका दिसून येते. हा देश गेली हजारो वर्षे एकसंध असून त्यात फूट पाडण्याचे अनेकांकडून प्रयत्न झाले. परंतु त्यांच्या राष्ट्रभक्तीत किंवा देशप्रेमात कधीही फूट पडली नाही. भारतीय समाज विखुरला गेला आहे तो असमाजिक वर्णव्यवस्थेमुळे आणि चूकीच्या रूढी-परंपरेमुळे. भागवतांनी देशात भविष्यात पडणाऱ्या फूटीची भीती दाखवून मतांचे राजकारण न करता देशात सामाजिक समानता व आर्थिक विषमता कशी दूर होईल आणि या मार्गाने समाज व देश एकसंध कसा राहिल यादृष्टीने विजयादशमीच्या मुहूर्ताचा वापर आपले भागवत पुराण सांगण्यासाठी करावे, ही सूचना.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे