राजकारणातील ‘पनौती'
- by संजयकुमार सुर्वे
- Nov 24, 2023
- 596
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल "खिसेकापू" आणि "पनवती" अशा शब्दांचा वापर केल्यानंतर राजकीय वाद उफाळून आला. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली. राजस्थानमध्ये प्रचार करत असताना राहुल गांधी यांनी हे दोन्ही शब्द वापरले होते.
प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये राजकीय पक्ष मुद्यावरून गुद्यावर येताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी यांना "पनौती" म्हणून संबोधण्यात राहुल गांधी यांनी धन्यता मानली. अर्थात अशी हलकी भाषा वापरताना नेत्यांना आपल्या वक्तव्याचे काय परिणाम होतील हे कळत नाहीत किंवा अशा शब्दांचे जाणीवपूर्वक निवड नेत्यांकडून केली जाते हे उमजत नाही. मग अशा वक्तव्यांचेही चाहते सर्वच पक्षात असल्याने आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, सवंग लोकप्रियतेसाठी अशी अश्लाघ्य विशेषणे वापरली जातात.
निवडणुका विचारावर लढवल्या पाहिजेत. विकासकामांना आणि मूलभूत मुद्यांना निवडणुकीत स्थान मिळायला हवे; परंतु राजकीय पक्ष आता मुद्यावरून गुद्यावर आले आहेत. भावनिक मुद्यांना महत्त्व यायला लागले आहे. पूर्वी प्रचार संपल्यानंतर परस्परविरोधी निवडणूक लढवत असलेले नेते एकत्र जेवण करत. परस्परांची आस्थेने विचारपूस केली जात असे. आता विचाराची जागा अविचाराने घेतली आहे. परस्परांना दूषणे देण्यात, एकमेकांची उणीदुणी काढण्यात आणि परस्परांना शेलकी विशेषणे देण्यात धन्यता मानली जात आहे. 2014 पासून राजकारणातील भाषेचा स्थर घसरून सर्वानी एकमेकांचा उद्धार करण्यास पनौती मार्ग अंगिकारला हे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते. त्यात आता कुणाचाही अपवाद राहिलेला नाही. केवळ उठवळ नेतेच नाही, तर सोनिया गांधी, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गिरीराज सिंह, साध्वी प्रज्ञासिंह, उमा भारती, असदुद्दीन ओवैसी, योगी आदित्यनाथ, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर, जयराम रमेश, कैलास विजयवर्गीय, अबू आझमी आदी अनेक वाचाळवीर नेत्यांचा समावेश होईल.
आज सर्वजण राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पनौती म्हटले म्हणून देशाचा अपमान झाला या अविर्भावात भाजपचे नेते आंदोलनाची भाषा वापरात आहेत. परंतु याच पंतप्रधानांनी आपल्या पदाची गरिमा न राखता केलेल्या वक्तव्याचा पाढा वाचल्यास ते देशाचे पंतप्रधान आहेत कि भाजपचे प्रचारक आहेत हा प्रश्न उपस्थित होतो. नरेंद्र मोदी हे आरएसएस चे प्रचारक होते आणि त्यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेला तेवढे महत्व नव्हते. पण आज ते 140 कोटी जनतेचे प्रतिनिधी असल्याने त्यांची जबाबदारी राहुल गांधींपेक्षा मोठी आहे हे कोणीतरी मोदींसह भाजप नेतृत्वाला सांगायला हवे. परंतु, शेलक्या विशेषणांची सुरुवात मोदी करतात आणि मग त्यांच्या विरुद्ध कोणी त्याच भाषेचा प्रयोग केल्यास त्यांना आपली जात, आपले पद आठवते यात खूपच विरोधाभास आहे. 2014 साली मोदी फक्त विकासाची भाषा आपल्या प्रचारात वापरत होते. मग तेच मोदी आता विकासाचा "व" बोलण्यास तयार नसून सतत विरोधकांची टिंगळ-टवाळी करणे, त्यांच्या आघाडीच्या नावावरून त्यांना हिणवणे, कपड्यांवरून विशिष्ट समाजाचा उल्लेख करणे या असल्या वागण्याने ते स्वतःची प्रतिमा मलिन करत असताना इतरांनी त्यात थोडी भर घातली तर त्याच काय एवढं वावडं. पण प्रत्येक घटनेचं भांडवल करून त्याचा निवडणुकीत वापर करण्याचं कसब त्यांनी आत्मसात केल्यानं आणि त्यास गोदी मीडियाची साथ मिळाल्यानं अशा घटनेची ते आतुरतेनं वाट पाहत असतात असे त्यांच्या पनौती शब्दाच्या प्रतिक्रियेवरून जाणवते.
सर्वसाधारणपणे पनौती हा शब्द एखाद्याच्या वाईट घटनेच्या किंवा अपयशाच्या कारणासाठी वापरला जातो. परंतु एखाद्या व्यक्ती विरुद्ध सार्वजनिक मंचावरून पनौती हा शब्द वापराने हे निश्चित निषेधार्य आहे आणि तो शब्द जर देशाच्या पंतप्रधानांबाबत असेल तर त्याचा धिक्कार होणे गरजेचं आहे. राजस्थानमधील प्रचार दरम्यान राहुल गांधी यांनी पीएम म्हणजे पनौती पंतप्रधान म्हणणे निश्चित चुकीचे आहे. यापूर्वी सोनिया गांधी यांनी गुजरात मधील दंगली वरून “मौत का सौदागर” हा शब्द मोदींसाठी गुजरात निवडणुकीत वापरला आणि होती नव्हती तेव्हढी सहानभूती काँग्रेस गमावून बसली. 2019 च्या निवडणुकीत मणिशंकर अय्यर यांनी मोदींच्या कृत्यांना नीच संबोधले, पण मोदींनी आपल्याला नीच म्हटले, ओबीसी समाजाला नीच म्हटले अशी प्रचाराची राळ उठवून त्यावर मतांचे राजकारण केले. परंतु त्यावेळी पुलवामा हल्ल्याची सहानभूती आणि खोट्या देशभक्तीचा घुमार मोदी यांच्या पाठिशी होता. पण गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची लाट आहे कि नाही ते येत्या तीन डिसेंबरला स्पष्ट होईल, चार राज्यात भाजप हरली तर विरोधकांकडून हा हल्ला अजून तीव्र आणि वैयक्तिक पातळीवर होईल. त्यावेळी ना ईडी, ना सीबीआय मदतीला असेल. बदलणाऱ्या वाऱ्याबरोबर सर्वच आपली दिशा बदलतात त्यास ईडी व सीबीआयही अपवाद नसेल.
प्रत्येक घटनेचं इव्हेंट करायची सवय विश्वचषकामधील पराभवानंतर मोदींच्या अंगाशी आली. वास्तवीक पाहता विश्वचषकातील अंतिम सामना हरणे हि भारतीय संघासाठी मोठी धक्कादायक बाब होती. संपूर्ण संघाला या धक्क्यातून सावरायला वेळ द्यायला हवा होता. पण "आपदामे अवसर" शोधणारे मोदी थांबतील तर शपथ. लगेच कॅमेरा घेऊन भारतीय संघाच्या ड्रेससिंग रूममध्ये जाऊन कोणाला बाबू, कोणाला काय-काय म्हणून हाक मारत होते याच भान त्यांना नव्हते. त्याच थेट प्रक्षेपण टीव्हीवर सुरु होत. मिळेल त्याला कवटाळ, मिठी मार असा प्रकार सुरु करून खेळाडूंनाच लज्जित केलं. भारतीय संघ सर्व सामने ऐटीत जिंकत अंतिम फेरीत गेला आणि यावेळी विजयी होणार याची खूणगाठ सर्वानी बांधली होती. कदाचित मोदींनीही विजयानंतर खेळाडूंना मिठी मारून जिंकल्यावर शुभेच्छा देण्याचं स्वप्न बाळगले असेल. मात्र काळाच्या मनात वेगळे होते पण मोदींनी आपल्या मनातील इच्छा भारत हरल्यानंतरही पूर्ण करून त्यांनी काळावर मात केली असेच म्हणावे लागेल.
यापूर्वी देशात तेलाचे भाव कमी झाल्यावर असा नशीबवान पंतप्रधान तुम्हाला हवा कि नको असा सवाल त्यांनी देशवासियांना विचारला होता. खर तर तेलाचे भाव कमी झाले यात मोदींचे काहीही योगदान नव्हते तसेच भारताच्या पराभवात मोदींचा काहीही संबंध नव्हता. पण प्रत्येक यशाचे श्रेय स्वतः घेणाऱ्या मोदींना यावेळी अपयशाचे श्रेय जनतेनं दिल एव्हढाच काय तो फरक. परंतु, मोदींना अप्रत्यक्षपणे या अपयशासाठी जबाबदार धरणाऱ्या लोकांनी पनौती हा शब्दप्रयोग करणे चुकीचे होते. मोदींच्या चमकोगिरीला अन्य भाषेत उत्तर देऊन त्यांना बॅकफूटवर नेणं विरोधकांना सहज शक्य होत. पण, विरोधकांनी मोदींना पनौती म्हणून स्वतःच्या पाठीमागे पनौती लावली हे निश्चित. भाजप याचा पुरेपूर वापर प्रचारात करेल पण हि राजकीय पनौती मोदींना तारक ठरते कि मारक ठरते ते तीन डिसेंबरला कळेल. तोपर्यंत आपण पनौती शब्दामागील मागील राजकारणाचा आनंद घेऊ.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे