रोडपालीत विकास कामांचा धुरळा

कळंबोली : विकसीत होत असलेल्या रोडपाली नोडमध्ये अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. पाणी, कचरा, बेकायदा पार्किंग, वाहतूक कोंडी आदी अनेक प्रश्‍न भेडसावत आहेत. या ठिकाणी मोठमोठी बांधकामे सुरू असल्याने रस्त्यावर मातीच माती पसरली आहे.  विकास कामांचा धुरळा उडत असल्याने प्रदुषणही वाढले आहे. परिसरात धूळप्रदूषण वाढले असून त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून येत आहेत. 

कळंबोली वसाहतीच्या वरच्या भागात साडेबारा टक्के जमिनीवर रोडपालीचे सेक्टर विकसित करण्यात आले आहेत. सेक्टर 13, 14, 15, 16, 17 आणि 20 येथे नागरी वस्ती आहे. येथे तीन वर्षांपूर्वी केबल टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे बरेच रस्ते उखडले आहेत. सिडकोने त्यावर अद्याप मलमपट्टी केलेली नाही. सध्या रोडपाली तलावालगतच्या भूखंडावर सिडकोचे गृहनिर्माण सुरू आहे. अनेक खाजगी इमारती परिसरात उभ्या राहत आहेत. या भागात पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. या सर्व कामाकरता मोठे खोदकाम केले जात आहे. येथील माती उचलून दुसर्‍या ठिकाणी वाहून येत असताना ती रस्त्यावर पडते. तसेच बांधकाम साहित्य आजूबाजूला पडल्याने रस्त्यावर माती पसरल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय झाला होता. आता तापमानात वाढ झाल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. एखादे वाहन गेल्यास प्रचंड धूळ उडते, त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला आहे. रोडपाली गावासह सेक्टर 15, 17 आणि 20 मधील वातावरण धूरकट झाले आहे. आजूबाजूच्या इमारतीमध्येही धूळ उडत असल्याने दारे-खिडक्या कायम बंद ठेवाव्या लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच परिसरातील दुकानदारही धुलीकणामुळे हैराण झाले आहेत. डंपर आणि हायवामधून बाहेर पडलेली माती त्वरीत बाजूला करणे, हे त्या त्या बांधकाम ठेकेदारांचे काम आहे. तसेच धूळ उडू नये म्हणून त्यावर पाणी मारणे गरजेचे आहे. परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे प्रभाग सात मधील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी महापालिका आणि सिडकोकडे केली आहे. याविषयी त्या त्या ठेकेदार आणि बिल्डरांना सूचना द्यावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बांधकाम परवानगीचे नियम धाब्यावरपनवेल महापालिकेने रोडपालीतील गृहप्रकल्पांना बांधकामाची परवानगी दिली आहे. ही परवानगी देत असताना आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होता कामा नये. तसेच बांधकाम साहित्य आणि माती, डबर, ग्रीट पावडर, सळई रस्त्यावर पडता कामा नये, याप्रमाणे अनेक अटी आणि शर्ती घातल्या जातात. परंतु रोडपाली येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी हे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. महापालिकेच्या परवानगी देणार्‍या विभागाकडून याबाबत कारवाई होणे अपेक्षित आहे.