नवी मुंबईतील गुंतवणुक धोक्याची
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2023
- 629
भुखंड ताब्यात नसताना सदनिका विकण्याचा विकासकांचा गोरखधंदा
नवी मुंबई ः सिडकोने नवी मुंबईतील अनेक नोडमधील शिल्लक भुखंड विक्रिस काढले आहेत. या भुखंडांसाठी 10 टक्के अनामत रक्कम भरुन 30 ते 40 टक्के कमी दराने या भुखंडावर बांधण्यात येणाऱ्या सदनिका ग्राहकांना विकण्याचा गोरखधंदा विकासकांनी नवी मुंबईत सुरु केला आहे. सिडको या बेकायदेशीर व्यवहारावर गप्प असून भविष्यात ग्राहकांची गुंतवणुक धोक्यात आल्यास याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न गुंतवणुकदारांना पडला आहे.
नवी मुंबईतील नियोजन प्राधिकरण असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महापालिकेने विकास आराखडा बनवण्यास सुरुवात केल्यानंतर सिडकोने या दोन्ही प्राधिकरणांच्या क्षेत्रातील भुखंड विक्रिचा सपाटा लावला आहे. गेल्या तीन वर्षात सिडकोने 300 हून अधिक भुखंड विकले असून त्यातून शेकडो कोटी रुपये जमा केले आहेत. हे भुखंड विकताना सिडको 10 टक्के अनामत रक्कम आकारत असून यशस्वी विकासकाला भुखंड विक्रिचा पहिला हफ्ता तीन महिन्यात तर दुसरा हफ्ता वाढीव कालावधीसह 16 महिन्यात भरण्याची मुभा मिळते.
नवी मुंबईत सध्या अनेक छोटे विकासक एकत्रित येवून हे भुखंड चढ्या दराने विकत घेत आहेत. चढ्या दराने विक्रि झाली म्हणून सिडको प्रसारमाध्यमांद्वारे स्वतःची पाठ थोपटत आहे. परंतु, या व्यवहारामागील काळी बाजू जनतेला माहित नसल्याने विकासक नुसत्या इरादापत्राच्या अनुषंगाने ग्राहकांना सदनिका विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित भुखंडावर बांधण्यात येणाऱ्या एकूण सदनिकांपैकी 20 टक्के सदनिका बाजारभावापेक्षा 40 टक्के कमी दराने तर अतिरिक्त 20 टक्के सदनिका 20 टक्के दराने एकरक्कमी विकत आहेत. या आलेल्या पैशातून सदर विकासक जमिनीची रक्कम सिडकोला भुखंडापोटी देत आहेत. या गोरखधंद्याला कुठलेही कायद्याचे अधिष्ठान नसून सदनिका विकायच्या झाल्यास त्यास बांधकाम परवानगी व महारेराकडे नोंदणी गरजेची आहे. असे असतानाही विकासक सदनिका कोणत्या अधिकारात विकत आहेत हा सवाल या क्षेत्रातील जाणकारांना पडला आहे.
भविष्यात सदर विकासकाचे बरेवाईट झाल्यास किंवा सदर विकासक सिडकोची उर्वरित रक्कम भरण्यास अपयशी ठरल्याने भुखंड वाटप रद्द झाल्यास सदनिकेत गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक संस्था ग्राहकांचे प्रबोधन करत असले तरी कमी किंमतीत घर मिळत असल्याने ग्राहक विकसकांच्या प्रलोभनांना बळी पडत असल्याचे दिसत आहे. या प्रकारावर सिडकोनेच ठोस भुमिका घ्यावी अशी मागणी ग्राहक संरक्षण कक्ष नवी मुंबई करत असून त्याबाबत सिडको विकासकांना सदनिका विकण्याबाबत कोणती मार्गदर्शक तत्वे जारी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai