टाकाऊपासून दोन आकांक्षी शौचालयांची निर्मिती
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 27, 2023
- 472
नवी मुंबई ः टाकाऊतून टिकाऊ या संकल्पने अंतर्गत कोपरखैरणे, सेक्टर 14 येथे एक अभिनव शौचालय उभारण्यात आले आहे. शासनाच्या निकषानुसार बनविण्यात आलेल्या या आकांक्षी शौचालयाचे लोकार्पण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
घनकचरा व्यवस्थापनात कचऱ्याचा पुनर्वापर ही एक महत्वाची बाब असून कोपरखैरणे येथे आकांक्षी शौचालय उभारताना 426 चौ.मी. क्षेत्रफळाच्या पुनर्प्रक्रियाकृत प्लास्टिक शीटचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 5.30 मेट्रिक टन एकल वापर प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे शौचालयाची सजावट 11 हजार 700 हून अधिक प्लास्टिक बाटल्यांचा वापर करुन करण्यात आली असून त्यातही लक्षवेधी बाब म्हणजे या शौचालयातील विविध सांकेतिक चिन्हे 35 हजार 200 हून अधिक बाटल्यांच्या झाकणांचा कलात्मक वापर करुन निर्माण करण्यात आलेली आहेत. शौचालय सजावटीसाठी संगणकाच्या 85 की-बोर्डचा उपयोग करण्यात आलेला आहे.
शौचालयासमोर तयार करण्यात आलेल्या आकर्षक वाहन प्रतिरूपासाठी 284 किलो इतक्या वजनाच्या टाकाऊ लोखंडी वस्तूंचा वापर करण्यात आलेला आहे. शौचालयासमोर नयनरम्य कारंजे उभारण्यात आले असून या कारंज्यासाठी प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर करण्यात येत आहे. अशा सर्वच बाबींमध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आलेला असून हे शौचालय थ्री आर संकल्पनेचे उत्तम उदाहरण आहे. 75 चौ.मी. क्षेत्रफळाच्या शौचालय बांधकामात पुरुषांसाठी 4 शौचकुपे व 1 स्नानगृह आणि 3 मुताऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच महिलांकरीता 3 शौचकुपे व 1 स्नानगृह आणि 1 बेबी टॉयलेट व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिलांसाठीच्या शौचालय व्यवस्थेत बेबी केअर सुविधा तसेच सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन, इन्सिनिरेटर, हॅन्ड ड्रायर अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत. दिव्यांगासाठी स्वतंत्र शौचकुपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. अशाच प्रकारचे आकांक्षी शौचालय सेक्टर 19 कोपरखैरणे येथे धारण तलावाजवळ उभारण्यात आलेले असून या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेने टाकाऊ पासून टिकाऊ रचनेचा नवा अविष्कार घडविलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai