ब्रँडच्या ब्रँडिंगसाठी कोट्यवधींची उधळण
- by संजयकुमार सुर्वे
- Dec 29, 2023
- 537
दोन वाक्याच्या अनमोल सल्ल्यासह सिडकोला 173 कोटींचे बिल सादर
नवी मुंबई ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या ब्रँडिंग, मार्केटिंग आणि विक्रीच्या सल्ल्यापोटी नेमलेल्या दलालाने 173 कोटींचे बिल सिडकोला सादर केले आहे. सिडको हा स्वतःच एक नावाजलेला ब्रँड असताना तसेच सिडकोच्या प्रत्येक लॉटरीला हजारो लोकांचा प्रतिसाद मिळत असताना सिडकोने ब्रँडिंग व मार्केटिंगच्या नावाखाली केलेला खटाटोप अंगलट येण्याची शक्यता आहे. सिडकोच्या या निर्णयावर सर्व स्तरावर टिका होत असून राज्य सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे खाजगी कंपन्यांची मदत घेवून विकण्याचा निर्णय 2021 मध्ये सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी घेतला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते व एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते.700 कोटी रुपयांचे कंत्राट नवी मुंबईतील थॉटरेन्स व हॉलिओस बाजार प्रा.लि.या कंपनीच्या समुह भागीदारीला दिले आहे. ही निविदा प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादात सापडली आहे. पंतप्रधान आवास योजनेतील बांधण्यात येणारी 67 हजार घरांच्या विक्रीसाठी सिडको 700 कोटी रुपये खर्च करत असताना छोट्या छोट्या मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारला घेरणाऱ्या विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर मौन साधून शिंदे यांना कात्रीत पकडल्याची चर्चा मंत्रालयात आहे. विरोधी पक्षतेने अंबादास दानवे यांनी या विषयाला वाचा फोडली असता याहीवेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या बचावासाठी चुप्पी साधल्याची चर्चा नागपुर अधिवेशनात होती.
दरम्यान, माहिती अधिकारात सल्लागाराने ब्रँण्डींग आणि मार्केटिंगच्या सल्ल्यापोटी दिलेले कागदपत्रे हाती लागली असून त्यात त्याने सिडकोला सादर केलेले 173 कोटींचे बिलही आहे. सल्लागाराने खांदेश्वर, मानसरोवर, जुईनगर, तळोजा, वाशी, बामनडोंगरी, पनवेल, कळंबोली व खारघर येथे बांधण्यात येत असलेल्या घरांसाठी ‘सिडको स्ट्रॅटिजी' व ‘मार्केटिंग स्ट्रॅटिजी' असा दोन भागात हजारो पानांचा अहवाल दिलेला आहे. सदर अहवालात अनेक गंभीर त्रुटी असून हे दोन्ही अहवाल एकमेकांची फोटो कॉपी आहेत. खांदेश्वर अहवालात कळंबोलीचा उल्लेख असून मानसरोवरच्या मार्केटिंग अहवालात सानपाडा व जुईनगरचा उल्लेख आहे. सुरुवातीच्या दोन अहवालात सिडको स्ट्रॅटिजीचा उल्लेख असून नंतर सिडको ऐवजी मार्केटिंग स्ट्रॅटिजीचाच उल्लेख आहे. सल्लागाराने सादर केलेली सिडको स्ट्रॅटिजी व सल्लागाराची मार्केटिंग स्ट्रॅटिजी ही जवळजवळ समान असून सिडकोने कशासाठी केला एवढा अट्टाहास असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.
सल्लागाराने आपल्या मार्केटिंग स्ट्रॅटिजीमध्ये सर्व प्रकल्पांचे ब्रँण्डींग करावे व त्याला विशिष्ट थीम बेस नाव द्यावे एवढाच सल्ला प्रत्येक प्रकल्पाच्या विक्रिसाठी दिलेला आहे. लाखो घरे विकणारी सिडको ही देशातील सर्वात मोठा ब्रँण्ड असून त्यांच्या प्रकल्पाला ब्रँण्डींगची गरज काय? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. फक्त दोन वाक्यांच्या सल्ल्यासाठी शेकडो कोटी सिडकोने मोजले याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत असून राज्य सरकार याबाबत कोणता आदेश देते याकडे राज्याचे लक्ष आहे. या संपुर्ण प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलेली चुप्पीने या प्रकरणाचे गांर्भिय वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
- आर्थिक दुर्बल घटकांवर अन्याय
सल्लागाराने सादर केलेल्या ब्रँडिंग स्ट्रॅटिजी अहवालात एकुण 67 हजार घरांपैकी 26,119 घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी, 7950 घरे मध्यम वर्गीय घटकांसाठी तर 33,996 घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नसलेल्या घटकांसाठी नमुद केले आहे. सिडकोने आतापर्यंत 67 हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यात केलेली कपात ही आर्थिक दुर्बल घटकांवर अन्याय करणारी असल्याचे या अहवालातून दिसून येत आहे.
अडीच चटई निर्देशांकाचे काय?
- राज्य सरकारने आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत म्हणून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी अडीच चटई निर्देशांक मंजुर केला आहे. त्यासाठी सदर प्रकल्पाची साईट ही रेल्वे स्थानक वा बस स्थानकापासून 500 मीटरच्या अंतरावर असावी अशी अट घातली होती.
- या अटीची पुर्तता करण्यासाठी सिडकोने वाशी व कळंबोली ट्रक टर्मिनल, बामनडोंगरी, मानसरोवर, खांदेश्वर, खारघर, खारकोपर, जुईनगर, सानपाडा या रेल्वे स्थानकालगतच्या मोकळ्या जागांचा वापर केला आहे. जर 39,096 घरे ही आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांसाठी उपलब्ध होणार नसतील तर या अटीचा भंग तर झाला नाहीना असा प्रश्न तज्ञांना पडला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे