दिघ्यापर्यंत पोहोचणार मोरबेचे पाणी

महापालिकेकडून 11 कोटींचा खर्च 

नवी मुंबई : नववर्षात मोरबे धरणाचे पाणी दिघ्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने वेगाने काम सुरू केले आहे. या योजनेमुळे ऐरोली, दिघा आणि रबाळेसह एमआयडीसी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळणार आहे.

स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका आहे. खालापूरनजीक धावरी नदीवर हे धरण आहे. नवी मुंबई महापालिकेचा प्रतिदिन 450 दशलक्ष लीटर क्षमतेचा हा स्वत:च्या मालकीचा जलस्रोत आहे. भोकरपाडा येथे 450 दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नवी मुंबई शहरात मोरबे धरणातून दिवसाला अंदाजे 430 एमएलडी पाणी उचलले जाते. यातील पाच एमएलडी पाणी मोरबे धरणानजीकच्या गावांना दिले जाते. तर पुढे सिडकोने वसवलेल्या कामोठे भागासाठी 35 दशलक्ष लीटर पाणी दिले जाते. तर पुढे येऊन पाच एमएलडी पाणी हे खारघर उपनगरासाठी दिले जाते. तर उर्वरित पाणी नवी मुंबई शहराला दिले जाते; परंतु आजवर मोरबेचे पाणी दिघ्यापर्यंत पोहोचलेले नाही.

ऐरोली, दिघा आणि रबाळे या परिसरातील झोपडपट्टी आणि परिसरातील लाखो रहिवाशांना अद्याप एमआयडीसीकडून पालिका 55 एमएलडी पाणी घेऊन पोहोचवले जाते; परंतु पालिकेने मोरबेचे पाणी दिघ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी सुमारे 11 कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

रोज 450 दशलक्ष लीटर

महापे एमआयडीसी ते दिघा, ऐरोलीपर्यंतच्या टप्प्यात एक लाखाहून नागरिकांना याचा फायदा होणार आहे. यासाठी धरणातून प्रतिदिन सुमारे 450 दशलक्ष लीटर पाणी उचलले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी दिली.