Breaking News
पामबीच मार्गावरील साडेतीन हजार कोटींच्या प्रकल्पांना उभारी
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या रडार आणि डॉप्लर यंत्रणेसाठी सिडकोने नवीन जागा शोधल्याने पामबीच मार्गावरील हजारो कोटींच्या प्रकल्पांना उभारी आली आहे. रडार यंत्रणा अन्यत्र बसवण्यात येणार असल्याने इमारतींची उंची मनाजोगी वाढवणे शक्य होणार असल्याने विकासकांनी हुश्य केले आहे.
सिडको व विमानतळ प्राधिकरणाने नवी मुंबई विमानतळाच्या रडार आणि डॉप्लर यंत्रणेसाठी एनआरआय संकुलालगतच्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील मोकळ्या जागेत रडार यंत्रणा उभारण्याचे निश्चित केले होते. उंच इमारतींच्या उभारणीमुळे रडारच्या लहरींना अटकाव होवू नये म्हणून रडारच्या फनेलमधील इमारतींच्या उंचीवर बंधने घातली जातात. सिडकोने पामबीचलगत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी रहिवाशी व वाणिज्य वापरासाठी मोठे भुखंड वितरीत केले असून विकासकांनी मोठ्या बोलीने हे भुखंड विकत घेतले आहेत. सदर जागेवर विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी लागणारी रडार आणि डॉप्लर यंत्रणा जर एनआरआय मागील जागेत कायम ठेवली असती तर या सर्व भुखंडांना उपलब्ध भु-निर्देशांक वापरणे अशक्य ठरले असते. या प्रकल्पांमध्ये अदाणी समुहाच्या गृहप्रकल्पासह उच्चपदस्थांसाठी सिडको बांधत असलेल्या प्रकल्पाचा समावेश आहे.
ही रडार आणि डॉप्लर यंत्रणा इतरत्र हलवावी म्हणून नवी मुंबईतील बिल्डर लॉबीने मोठी ताकद यामागे लावली होती. यामुळे तीन हजार कोटी रुपयांचे बांधकाम प्रकल्प आणि जमिनीचे व्यवहार ठप्प होतील असा अहवाल सिडकोनेच केंद्र सरकारला सादर केला होता. पाहणी दौरे, तांत्रिक अहवालांनंतर हे रडार आणि निरीक्षण यंत्रणा बेलापूरलगत शहाबाज आणि नियोजित विमानतळाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या डुंगी गावालगत हलविण्याचा निर्णय झाला आहे. याशिवाय दुसरी रडार यंत्रणा विमानतळाच्या अंतर्गत भागात तर तिसरा रडार हा माथेरानच्या डोंगरावर उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.त्यामुळे पाम बीच परिसरातील आलिशान बांधकाम प्रकल्पांना दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारने डिसेंबर 2025 मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमान उडविण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai