Breaking News
आ. मंदाताईंच्या पुढाकाराने 7 कोटींचा निधी मिळाला
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध विकासकामांसाठी आमदार मंदा म्हात्रे या पुढाकार घेऊन निधी मंजुर करुन घेतात. आमदार निधी आणि स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी अनेक प्रकल्प उभारले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे आता सानपाडा येथील श्रीदत्त मंदिराकडे जाणाऱ्या सेवा रस्तासह संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी एकुण 7 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुर करण्यात आला आहे.
श्रीदत्त मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यासह संरक्षक भिंतीचे काम अनेक वर्ष रखडले होते. त्यांच्या डागडुजीसाठी अनेक दिवस स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते. दत्त जयंतीसह दररोज अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. परंतु, काही दिवसांपासून श्री दत्त मंदिरामध्ये जत्रेसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना रस्ता हा अरुंद पडत असे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी सानपाडा ग्रामस्थांनी मंदाताई म्हात्रे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन त्यांनी नवी मुंबई महापालिका वा सिडको नव्हे तर थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून 20 कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यातून पहिल्या टप्प्यात 4 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन मंदाताई व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सदानंद पाटील, बाळाराम पाटील, सोमनाथ वास्कर, दिलीप मढवी, महेश मढवी, भार्गव मढवी, रूपेश मढवी, अंबाबाई रघू दळवी, चांगूबाई चिंतामण वास्कर, लक्ष्मी वसंत ठाकूर या सानपाड्यातील ग्रामस्थांसह ओमप्रकाश पवार (उपविभागीय अभियंता बहुमजली इमारती बांधकाम उपविभाग क्र. 1 तुर्भे), केशव कारगुडे (कनिष्ठ अभियंता), ऋषीकेश कासार (कनिष्ठ अभियंता), दिगंबर घाडी (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक) विजय आडबले (ठेकेदार) उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 कोटींचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यातील या 4 कोटींच्या कामानंतर दुस़ऱ्या टप्प्यात सायन-पनवेल मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी विकासकामे करण्यात येणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai