Breaking News
टेकडी कापण्यासाठी सिडकोची निविदा; विमान उड्डाण लांबणीवर?
नवी मुंबई ः डिसेंबर 2025 मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले विमान उडण्याचे स्वप्न पाहिलेल्या नवी मुंबईकरांना यासाठी डिसेंबर 2026 ची वाट पहावी लागेल. सिडकोने पुष्पकनोडमधील क्षेत्र विकासासाठी उर्वरित खडकाचे निष्कर्षण करण्यासाठी व उलवे हिलच्या दक्षिणेकडील भाग कापण्यासाठी नव्याने 64 कोटींची निविदा मागविल्याने उत्खनन इथले संपत नाही अशी अवस्था सध्या नवी मुंबई विमानतळ क्षेत्राची झाली आहे. त्यामुळे येथील विमान उड्डाण लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सिडको हद्दीतील उलवे नोडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे भुमिपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये केले होते. त्यावेळी 2019 मध्ये या विमानतळावरुन पहिले विमान उडण्याचे स्वप्न नवी मुंबईकरांना दाखविण्यात आले. या विमानतळाच्या निर्मितीसाठी उलवे टेकडीचे निष्कर्षण करण्यासाठी सिडकोने सूमारे 1700 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविली होती. या उत्खननातून निर्माण झालेला दगड आणि माती विमानतळाच्या भरावासाठी वापरण्यात आला. दरम्यान, कोरोना संक्रमणात दिड वर्षाचा कालावधी गेल्याने 2023 साली विमान उडण्याचे निश्चित करण्यात आले.
सिडकोने उलवे टेकडी निष्कर्षण करण्यासाठी केलेली तरतूद अपुरी असल्याने 2020 साली नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. हे काम आसामच्या भारती इन्फ्रा प्रो.लि. यांना देण्यात येऊन दोन वर्ष काम पुर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला. सदर काम पुर्ण करण्याचा कालावधी उलटून गेल्यावरही सदर काम अजूनही सुरुच असून सिडकोने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिणेकडील पुष्पकनोडमधील क्षेत्र विकासासाठी उर्वरित खडकाचे निष्कर्षण करण्यासाठी 64 कोटी रुपयांची निविदा मागविली आहे. हे काम पुर्ण करण्याचा कालावधी 365 दिवसांचा देण्यात आला असून म्हणजेच दगड निष्कर्षणाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार आहे. या निविदेनंतर सूमारे 400 कोटींची खडक निष्कर्षणाची निविदा पाईपलाईनमध्ये असल्याचे सिडकोतील खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रिया संपणार कधी आणि प्रत्यक्ष उत्खननास सुरुवात होणार कधी अशा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे. विमानतळावरुन विमान उडण्याची तारीख जवळ आली तरी उत्खनन इथले संपत नाही अशी अवस्था सध्या विमानतळ क्षेत्राची आहे. त्यामुळे सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले असून केंद्र सरकारने सदर काम आपल्या अखत्यारित करावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे