Breaking News
आपल्या विलक्षण कलागुणांनी अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक असा चौफेर वावर करून मनोरंजन विश्वातील अनेक विक्रम नावावर नोंदविणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी "जन्मऋण" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजविण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी करून 'आभाळमाया' या मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची निवड त्यांनी बाजी मारली आहे.
मूल जन्माला येताना आई व मुलातील नाळ कापली जाते आणि तिथेच तो एक व्यक्ती म्हणून उदय पावतो. नाळ कापली तरी आई-बापाचं मुलांप्रतीचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. पण मुलं मोठी झाली की पालकांची संपत्ती, मालमत्ता किती आहे याचा विचार करताना दिसतात. पालक मात्र यापासून अनभिज्ञ असतात. जेव्हा मुलांना पालकांच्या अस्तित्वापेक्षा त्यांच्या मालमत्तेचा मोह पडतो तेव्हा काय होतं? पालकांनी अशावेळी काय करावे? मुलांमध्ये होणारे बदल कसे ओळखावे? नातेसंबंधाकडे कोणत्या दृष्टीने पहावे? बदलत्या काळानुसार त्याची पावलं कशी ओळखावी? याच विषयावर आधारित "जन्मऋण" हा त्यांचा चित्रपट आहे.
"श्री गणेश फिल्म्स" निर्मित आणि "श्री अधिकारी ब्रदर्स" प्रस्तुत 'जन्मऋण' चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, धनंजय मांद्रेकर, तुषार आर.के., अनघा अतुल आणि खास भूमिकेत पाहुणे कलाकार म्हणून हिंदी मालिका - चित्रपट अभिनेते महेश ठाकूर यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते. येत्या 15 मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा व नवीन दृष्टिकोन मिळवा.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai