पाणथळ जागा आता रहिवासी वापरात
- by संजयकुमार सुर्वे
- Mar 08, 2024
- 487
महानगरपालिकेचे रोहित पक्षांच्या निवासावर अतिक्रमण
नवी मुंबई ः वन विभागाने रोहित पक्षांची निवासस्थाने पाणथळे म्हणून आरक्षित केलेली असतानाही पालिकेच्या नगररचना विभागाने विकास आराखडा बनवताना त्यावर निवासी वापर प्रस्तावित केल्याने नवी मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याउलट सिडकोच्या नोडल नकाशात सदर जागा आजही प्रादेशिक उद्यानासाठी राखीव ठेवली असल्याने पालिकेच्या नगररचना विभागाचे पितळ उघडे पडले आहे. याची दखल प्रसारमाध्यमे व पर्यावरण प्रेमींनी घेतल्यावर पालिकेने केलेला खुलासा त्याहुन अजब असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नवी मुंबई महापालिकेचा बहुचर्चित विकास आराखडा गेल्या आठवड्यात जाहीर झाल्यावर त्यात नगररचना विभागाने केलेल्या अनेक बदलांमुळे तो चर्चेत आला आहे. यापुर्वी नगररचना विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना व अधिनियम 1966 मधील कोणत्याही कायदेशीर तरतूदींची पुर्तता न करता अडवली-भुतवली येथील प्रादेशिक उद्यान विभागात रहिवासी वापर प्रस्तावित केल्याने मोठा गहजब माजला होता. एवढ्यावरच सह संचालक सोमनाथ केकाण यांचे मन भरले नाही म्हणून त्यांनी नेरुळ नोड मधील करावे गाव व एनआरआय संकुलालगत असलेल्या वॉटर बॉडीवर रहिवासी वापर प्रस्तावित केल्याने पुन्हा एकदा नवी मुंबईकरांत संतापाची लाट उसळली आहे. विकास आराखडा महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना व अधिनियम 1966 कलम 26(1) अन्वये जनतेच्या सूचना व हरकतींसाठी प्रसिद्ध केला असता सदर भाग पालिकेने आपल्या नकाशात पाणथळे (वॉटर बॉडी) म्हणून आरक्षण प्रस्तावित केले होते. परंतु, सदर विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी कलम म.प्रा.न.अ कलम 28(4) अन्वये शासनाकडे मंजुरीसाठी पाठवताना त्यावर रहिवासी वापर प्रस्तावित केल्याचा बदल केला आहे. सदर बदल हा विकासकांच्या दबावापोटी केला गेला असल्याची चर्चा पालिकेत रंगली असून यावेळी संबंधितांनी अधिकाऱ्यांना पेट्यांऐवजी खोके (आंब्याचे) पाठवल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नोडल प्लॅनमध्ये सदर जागा अजूनही प्रादेशिक उद्यानासाठी राखीव ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालिका आणि सिडको या दोन्ही प्राधिकरणात विसंगती असल्याचे पुढे आले आहे.
सदर प्रकरणाची दखल प्रसारमाध्यमे व पर्यावरण प्रेमींनी घेतल्यानंतर खडबडून जागे झालेल्या नगररचना विभागाने सर्वांना खुलासा पाठवला आहे. त्यामध्ये वन विभागाने सदर जागा पाणथळे म्हणून आरक्षित केल्याचे पालिकेला कळवले नसल्याचे म्हटले आहे. हे जर खरे असेल तर पालिकेने सूचना व हरकती प्रसिद्ध करताना सदर जागांवर पाणथळे हे आरक्षण का प्रस्तावित केले होते याचा उलगडा होत नाही. सदर आरक्षण हे सिडकोच्या नोडल नकाशानुसार प्रस्तावित केल्याचे केकाण जरी म्हणत असले तरी आजही सिडकोच्या नोंडल नकाशामध्ये सदर क्षेत्र प्रादेशिक उद्यानासाठी राखीव आहे. त्यामुळे पालिकेने केलेला खुलासा हा वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
- पालिकेचा खुलासा
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नेरुळ सेक्टर-60 येथील जागांवर सिडकोकडून प्राप्त झालेल्या अद्ययावत नोडल नकाशा प्रमाणे रहिवास वापर विभाग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. वन विभागाकडून अथवा महसूल विभागाकडून सदरचे क्षेत्र हे पाणथळ म्हणुन घोषीत करण्यात आले असल्याचे महानगरपालिकेच्या अभिलेखी दिसून येत नाही. सदरच्या क्षेत्रावर सूचविलेला रहिवास बदल हा प्रारुप असुन तो सिडकोकडील नोड नकाशा विचारात घेऊन प्रस्तावित केलेला आहे. - पालिकेच्या तकलादू खुलाशामागील पूर्ण सत्य
द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी 2019 मध्ये राज्यातील पाणथळ क्षेत्रांबाबत प्रसिध्द केलेल्या अहवालात नेरूळ येथील टि.एस चाणक्य मागील क्षेत्र तसेच एनआरआय गृहसंकूलामागील क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. हे क्षेत्र स्थलांतरित रोहित पक्षांचे ठिकाण असून त्याचे वनसंपदा संवर्धन कायदा 1972 अन्वये संवर्धन व संरक्षण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अति. प्रधानसचिव कांदळवन कक्ष यांनी जिल्हाधिकारी, ठाणे व व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांना 29 एप्रिल 2020 रोजी लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे. या पत्राव्दारे त्यांनी सिडको व ठाणे जिल्हाधिकारी यांचा अभिप्राय मागविला आहे. याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने कोणतीही खातरजमा न करता सदर पाणथळ जागांवर रहिवास वापर प्रस्तावित करून वर्षानूवर्षे नवी मुंबईतील वरिल क्षेत्रांवर स्थलांतरित होणाऱ्या रोहित पक्षांच्या निवासस्थानांवर पालिकेने अतिक्रमण केले आहे.
- केकाणेंची उचलबांगडी करा!
देशात फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरातील फ्लेमिंगोंच्या निवासस्थानावर पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी सोमनाथ केकाण यांनी रहिवाशी वापर प्रस्तावित करून घाला घातला आहे. यामुळे फ्लेमिंगो सिटी म्हणून असणारी शहराची ओळख कायम पूसली जाणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सदर वापर बदल हा विकासकांच्या दबावापोटी अर्थपूर्ण हेतूने केल्याची चर्चा पालिकेत दबक्या आवाजात आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्याची तात्काळ उचलबांगडी पालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी आता नवी मुंबईत जोर धरू लागली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे