Breaking News
पुढील काही दिवसांत कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. असे असतांना जागावाटपासाठी एनडीए व इंडिया आघाडीच्या बैठकांचे सत्र वाढले आहे. यावेळी काँग्रेस पक्षाने स्वतःकडे कमीपणा घेऊन मित्र पक्षांना महत्व दिल्याने इंडिया आघाडीचे तिकीट वाटप जवळ जवळ अंतिम स्वरूप घेताना दिसत आहे. त्यातच भाजपने बिगुल वाजण्यापूर्वीच 195 उमेदवारांची यादी जाहीर करून विरोधक आणि एनडीए आघाडीतील घटकांवर दबाव वाढवला आहे. आपल्या कार्यकर्त्यामध्ये जोश भरण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असून त्यातच विरोधकांचे नेते फोडण्याचे प्रयत्नही जोरात सुरु आहेत. सरकारी यंत्रणा ईडी आणि सीबीआय यांनीही आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. मोदींनी तर 2024 नंतर निवडून आल्यावर कोणकोणत्या योजना पहिल्या 100 दिवसात राबवायच्या आणि कोणते निर्णय घ्यायचे यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. मोदींचा वैयक्तिक करिष्मा व इंडिया आघाडीचा एकत्रित सामना यामुळे 2024 ची लढाई निर्णायक ठरणार यात काही शंका नाही. देशात निवडणुकीची प्रतीक्षा असताना राहुल गांधी भारत जोडो पर्व 2 मधुन जनतेला साद घालत आहेत.
एनडीएने जरी 548 पैकी 195 जागा जाहीर केल्याअसल्या तरी अजून 353 जागा जाहीर व्हायच्या आहेत. या अघोषित जागा बहुतांश दक्षिण राज्यातील आणि त्यांच्या मित्रपक्षांसोबत स्थापन केलेल्या राज्यातील असून भाजप सर्वांना सोबत नेण्याचा प्रयत्न करताना दाखवत आहे. त्यातच उत्तर प्रदेश नंतर जास्त जागा असलेल्या महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला दिसत नाही. स्वतः गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देखील बैठका झाल्या तरी मात्र, जागावाटपावरून महायुतीमध्ये एकमत होत नसल्याने तीनही पक्षात घमासान पाहायला मिळतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्या असा आग्रह अजित पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे कोणी काही मागायला हरकत नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय हा वास्तविकतेवर आधारित होईल, असे फडणवीस म्हणत आहेत. म्हणजेच, अजित पवारांना राष्ट्रवादीचे विद्यमान खासदारांच्या संख्येच्या प्रमाणातच लोकसभेच्या जागा दिल्या जातील, असा याचा अर्थ काढला जातोय. जर तसे झाले तर अजित पवार यांच्या वाट्याला 5 पेक्षा जास्त जागा येणार नाही. हाच फॉर्मुला शिंदे यांना लावल्यास त्यांना 15 जागा द्याव्या लागतील पण शिंदेंना दहापेक्षा जास्त जागा देण्याची मानसिकता भाजपाची नसल्याने महायुतीत कोणाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने जाहीर केलेल्या 195 उमेदवारांच्या यादीत मात्र महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवाराचे नाव नाही. लोकसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजण्यापूर्वी जागावाटपावरून महायुतीतील तीन प्रमुख राजकीय पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून अधिकच्या जागांची मागणी करण्यात आल्याने हा जागावाटपाचा पेच वाढला आहे. आता गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात शिंदे आणि पवार यांची नाराजी दूर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पण आहे त्या खासदारांना तिकीट मिळणार नसेल तर त्यांचे राजकीय भवितव्य काय? हा प्रश्न सध्या बंडखोरांना पडला आहे. भाजप याबाबतीत कोणतीही तडजोड करण्यास तयार नसून बंडखोरांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणे भाग पाडले जाऊ शकते. त्यामुळे या साठीच का केला होता अट्टाहास.. असे म्हणण्याची वेळ बंडखोरांवर येईल. असे झाल्यास बाळासाहेबांच्या विचारांचे काय याचे उत्तर बंडखोरांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवल्यास द्यावे लागेल आणि हीच बाब बंडखोरांना सलत आहे. त्यातच सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु झाल्याने शिंदे गटावरील दबावही वाढला आहे. ऐन निवडणुकीत विपरीत निर्णय आल्यास त्याचा फटका महायुतीला बसण्याच्या चिंतेने दिल्लीश्वर बिथरले आहेत.
भाजपच्या पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे दिसत आहे. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांची रवानगी दिल्लीला होऊ शकते. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांच्याही उमेदवारीवरून उलटसुलट चर्चा देशात सुरु आहेत. महाराष्ट्रातील जवळपास 40 टक्के विद्यमान खासदारांचे तिकीट भाजप कापणार असल्याचे बोलले जात आहे. हा प्रयोग भाजपने नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकात केला होता त्यात त्यांना चांगले यश मिळाले. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपने तयारी केली आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यश्र सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांना धुळ्यातून लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी 22 जागांची मागणी केली होती. मात्र, शिवसेनेला जास्तीसजास्त 12 जागा देण्यात येतील अशी हवा आहे.
दुसरीकडे, अजित पवार यांनी धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागांची मागणी केली. मात्र त्यांची 4 जागांवर बोळवण होईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचे नियोजन भाजपने केले आहे. उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला देशात सत्ता काबीज करणे सोपे जाते, असे दिल्लीच्या सत्तेचे गणित आहे. त्यामुळे हे दोन्ही राज्य भाजपसाठी महत्त्वाची आहेत. इंडिया आघाडीने सुद्धा या दोन राज्यात लक्ष केंद्रित केल्याने या दोन राज्यात इंडिया आघाडी भाजपचे किती नुकसान करते त्यावरच मोदींची वापसी ठरणार आहे.
युपीच्या खासदारांची संख्या नजरेसमोर ठेवून त्यांनी राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच त्याचे ओपनिंग केले. राम मंदिराच्या विषयाचा फायदा मिळेल अशी आशा भाजपाला आहे. गेल्या वेळी त्यांना 73 जागांवर विजय मिळाला होता. पण यावेळी काँग्रेस समाजवादी पक्ष देईल तेव्हड्या जागा पदरात पाडून निवडणूक लढवण्यास तयार झाल्याने युपीमधील भाजपाची गणिते बिघडण्याची शक्यता आहे. त्यातच वरुण गांधी कोणती भूमिका घेतात हेही मह्त्वाचे आहे. गेली आठ वर्ष मायावती विजनवासात गेल्याने त्यांची नुकसान करण्याची क्षमता कमी झाल्याने त्याचा फायदा इंडियाच्या आघाडीला होईल. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि बिहार या तीन राज्यात एकूण 166 जागा असून त्यापैकी 88% जागा एनडीएने मिळवल्या होत्या. महाराष्ट्र आणि बिहार मधून एनडीएला 60% जागांचा फटका बसत असल्याचे दिसत असून युपी मध्ये पण 30% जरी फटका बसला तरी मोदींची वापसी अशक्य असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसने अवाजवी भूमिका न घेता पहिले मोदी हटाव हि भूमिका घेतल्याने इंडिया आघाडी चमत्कार करण्याकडे वाटचाल करत असल्याचे राजकीय समीक्षक दबक्या आवाजात बोलत आहेत. मोदींनाही त्याची जाणीव झाल्याने त्यांनी ईडी आणि सीबीआयची गस्त वाढवली आहे. सध्या उच्च मध्यमवर्गात देशातील अघोषित हुकूमशाहीची चर्चा असून आंतरराष्ट्रीय प्रसामाध्यमांनी त्याची दखल घेतल्याने मोदी विरोधी जगभरात अंडरकरंट वाहू लागल्याची हे द्योतक आहे. अजून निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नसून पुढील आठवड्यात त्याची शक्यता आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या पुर्ण तयारीत असून जनता मात्र कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे जाणण्यासाठी बिगुल वाजण्याच्या प्रतीक्षेत देश आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai