सिडकोच्या मनमानीला पालिकेचा हिरवा कंदील
- by संजयकुमार सुर्वे
- Mar 15, 2024
- 572
पालिकेने केले ट्रान्सपोर्ट झोन रहिवाशी वापरात तबदिल
नवी मुंबई ः सिडको मनमानी करुन वेअर हाऊसिंग झोन व ट्रान्सपोर्ट झोनमध्ये बांधत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला पालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठी पालिकेच्या नगररचना विभागाने वाशी, सानपाडा, जुईनगर येथे आरक्षित असलेले ट्रान्सपोर्ट झोनमधील क्षेत्र रहिवाशी वापरात तबदिल केले आहे. सिडकोच्या मनमानीला पालिका आयुक्त खतपाणी घालत असल्याने नवी मुंबईकरांत संतापाची लाट उसळली आहे.
नवी मुंबई शहराची निर्मिती करताना विविध नोड्सच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिडकोने नागरी सुविधांचे अनेक भुखंड नोडल नकाशात आरक्षित ठेवले होते. त्यामध्ये उद्याने, खेळाची मैदाने, शाळा, वाहनतळ, विविध सेवासुविधा भुखंडांचा समावेश होता. मुंबईत रेल्वे स्थानकांलगत वाहनतळाची समस्या असल्याने सिडकोने नवी मुंबई रेल्वे प्रकल्पाचे नियोजन करताना सानपाडा, नेरुळ, वाशी, बेलापुर, मानसरोवर, खारघर, तुर्भे, जुईनगर इत्यादी रेल्वे स्थानकांनजिकच्या भुखंडांवर वाहनतळ व बस स्थानकांचे आरक्षण प्रस्तावित केले होते. त्यामुळे रेल्वेचा वापर करणाऱ्या नवी मुंबईकरांना त्यांची वाहने या वाहनतळांवर पार्किंग करुन बाहेर जाणे शक्य होते. मुंबईतील घाऊक बाजार नवी मुंबईत वसवताना शहरात येणाऱ्या गाड्यांच्या नियोजनासाठी ट्रक टर्मिनलचे नियोजन वाशी व कळंबोली येथे करण्यात आले होते. सदर जागा या ट्रान्सपोर्ट झोन या सदरात आरक्षित ठेवल्या होत्या.
सिडकोने 2018 साली ट्रक टर्मिनल व रेल्वे स्थानकांनजिकच्या वाहनतळांवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हजारो घरांच्या निर्मितीचा गृहप्रकल्प हाती घेतला. हे गृहप्रकल्प रहिवाशी झोनमध्ये नसतानाही सिडकोने मनमानीपणे बांधकाम सुरु केल्यावरही पनवेल महानगरपालिका किंवा नवी मुंबई महानगरपालिका यांनी या नियमबाह्य कृत्यास मज्जाव करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. याउलट दोन्ही नियोजन प्राधिकरणांनी त्यांचा प्रारुप विकास आराखडा शासनाच्या मंजुरीस पाठवताना संबंधित ट्रान्सपोर्ट झोनचे रहिवाशी वापरात बदल केला आहे. या बदलामुळे नवी मुंबईकरांना भविष्यात वाहतुकीचा, पार्किंगच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. वाशी ट्रक टर्मिनलमध्ये या आधीच बांधकाम सुरु केल्याने तेथे येणारे ट्रक आता लगतच्या रस्त्यांवर उभे राहत असल्याचे चित्र नवी मुंबईत असून सदर गृहप्रकल्प कार्यान्वित होण्यापुर्वीच अशी परिस्थिती असेल तर भविष्यात सुनियोजित शहराची काय अवस्था असेल याची कल्पना करवत नसल्याचे अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आधीच सेवासुविधांसाठी सिडकोने अपुरे नियोजन केले असताना त्यात पुनर्विकासाची भर पडल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. सिडकोच्या मनमानीला पालिकेनेच हिरवा कंदिल दाखवल्याने नवी मुंबईकरांची अवस्था आता आई जेवू घालीना आणि बाप भिक मागु देईना अशी झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे