650 जणांनी रुजवल्या स्मृती

स्मृती उद्यानांत केली रोपांची लागवड 

नवी मुंबई ः बिघडत चाललेल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड हा महत्वाचा भाग आहे. जनतेचा  यामध्ये सहभाग वाढवण्यासाठी पालिकेने स्मृतीवनाची संकल्पना अंमलात आणली आहे. 15 जूनपासून स्मृती वृक्षलागवडीला सुरूवात करण्यात आली होती. या वृक्षलागवडीला शहरातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 650 नागरिकांनी उद्यानात झाडांची लागवड केली असल्याची माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली.

महापालिकेकडून हरित नवी मुंबई संकल्पना राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत शहरात हिरवळ निर्माण करण्यासाठी वृक्षलागवड केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून स्मृती उद्यान निर्माण करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनासह स्मृतीवनातून प्रियजनांच्या स्मृती जपण्यासाठी पालिकेने नेरूळ येथील सेक्टर- 26 मधील ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्क या ठिकाणी स्मृती उद्यानाची निर्मिती केली आहे. पालिकेत 20 मे पासून ऑगस्ट अखेरपर्यंत स्मृती उद्यानाकरिता 650 अर्ज दाखल झाले होते. या अर्जदार नागरिकांकडून आपल्या प्रियजनांच्या आठवणी म्हणून स्मृती उद्यानात या झाडांची लागवड करण्यात आली असल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये बालकाच्या जन्माच्या आनंदानिमित्त शुभेच्छा वृक्ष, शुभविवाहाचे औचित्य साधून शुभमंगल वृक्ष, परीक्षा व इतर क्षेत्रातील यशाबद्दल आनंद वृक्ष, सासरी जाणार्‍या मुलीसाठी शुभेच्छा म्हणून माहेरची झाडी, प्रियजनांच्या मृत्यूनंतर स्मृतीवृक्ष अशा विविध प्रसंगाची आठवण वृक्ष रोपांची लागवड करून जपण्याची संकल्पना आहे. वृक्षलागवडीकरिता इच्छुक नागरिकांकडून प्रति वृक्ष एक हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यामध्ये महापालिकेच्या वतीने वृक्षरोपाकरिता खड्डा खोदणे, लालमाती, शेणखत भरणे, वृक्षलागवड करणे, ज्या व्यक्तीच्या नावाने वृक्ष लागवड केली गेली आहे त्याचे, तसेच वृक्षलागवड करणार्‍यांचे नामफलकदेखील लावण्यात आले असून, लागवड केलेल्या वृक्षरोपांचे तीन वर्षांसाठी संवर्धन करण्यात येणार आहे.