पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करा
- by Aajchi Navi Mumbai
- May 06, 2024
- 407
पालिका आयुक्तानचे आढावा बैठकीत निर्देश
नवी मुंबई ः पालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय व सुविधानिहाय आढावा विशेष बैठकीत घेतला. यामध्ये त्यांनी महापालिका क्षेत्रातील सुरु असलेल्या कामांची सद्यस्थिती शहर अभियंता तसेच आठही विभागांचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून विभागवार जाणून घेतली. सुरु असलेली कामे 15 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा कालावधी लवकर सुरु होणार असून पावसाचे दिवस कमी असतील मात्र तीव्रता अधिक असेल हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने तयारीत रहावे असे आयुक्तांनी सूचित केले. बेलापूर ते दिघा अशा आठही विभागात सुरु असलेल्या रस्ते, चौक आदी कामांची सदयस्थिती जाणून घेतानाच होल्डिंग पाँड व त्यावरील फ्लॅप गेट बसविण्याची कामेही तातडीने पूर्ण करुन घ्यावीत असे आयुक्तांनी निर्देश दिले. गटारांची सफाई करताना काढला जाणारा गाळ हा दोन ते तीन दिवसांतच उचलण्याची कार्यवाही काटेकोरपणे केली जावी असेही आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले.
मोठे नाले सफाईची कामे सुरु झाली असून त्या कामांना वेग दयावा आणि ती लवकरात लवकर विहित वेळेत पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष दयावे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. या नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात कोणताही अडथळा राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे सूचित करतानाच काही ठिकाणी नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात झोपडया असल्यास त्या हटविण्याची कार्यवाही करावी असेही नेिर्देश देण्यात आले. विभागवार सुरु असलेल्या पावसाळापूर्व कामांची सदयस्थिती काम निहाय लेखी स्वरुपात घेण्यात यावी तसेच 15 मे आणि 30 मे लाही त्या त्या वेळची स्थिती लेखी स्वरुपात आठही कार्यकारी अभियंत्यांकडून संकलित करावी व एकत्रित स्वरुपात सादर करावी असे निर्देश आयुक्तांनी शहर अभियंता यांना दिले.
मोठया उधाण भरतीची वेळीच अतिवृष्टी झाल्यास शहरात काही ठिकाणी पाणी साचते अशा संभाव्य ठिकाणी पाणी उपसा पंपांची व जनरेटरची पुरेशा संख्येने व्यवस्था करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी झोपडया असल्यास त्या स्थलांतरित कराव्यात असेही सूचित करण्यात आले. या कालावधीत पिण्याचे पाणी शुध्द राहील याची विशेष दक्षता घेण्यात यावी तसेच पाणीपुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्था सुस्थितीत कार्यान्वित राहील याचीही काळजी घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. शहरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी अपघात प्रतिबंधक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी घोषित करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. अतिधोकादायक इमारतींच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यात आलेले आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यादृष्टीने सदर इमारती रिक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच सुविधा कामांसाठी झालेले खोदकाम 15 मे पर्यंत पूर्ववत करुन घ्यावे असे सूचित केले.
पावसाळी कालावधीत साथीचे रोग उद्भवू नयेत यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात यावा अशा सूचना देण्यासोबतच नमुंमपा रुग्णालयांमध्ये साथरोग वॉर्ड कार्यान्वित करण्याचेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. उदयान विभागामार्फत होणाऱ्या वृक्षछाटणीमध्ये धोकादायक व अडथळा आणणाऱ्याच फांदयांची छाटणी केली जावी तसेच छाटणीनंतर होणारा हरित कचरा उचलून नेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाशी समन्वय राखून विनाविलंब कार्यवाही करावी असेही सूचित करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai