रिक्षांवर वायुवेगाची कारवाई

पनवेल ः 1 फेब्रुवारीपासून मुजोर रिक्षाचालकांवर वायुवेग पथकाद्वारे कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. तीन दिवसांत पनवेलमध्ये वायुवेग पथकाने 52 रिक्षांवर कारवाई केली आहे. या कारवाईचा वेग वाढणार असून रिक्षाचालकांच्या मुजोरीला चाप लागणार आहे. 

भाडे नाकारणे, मीटरप्रमाणे प्रवास करण्यास नकार देणे, विनापरवाना प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, विमा नसणे, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, रिक्षाचालकाचा गणवेश नसणे अशा अनेक तक्रारी आल्यामुळे पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी 1 फेब्रुवारीपासून वायुवेग पथकाच्या माध्यमातून तीन आसनी रिक्षाचालकांवर जोरदार कारवाई सुरु केली आहे. विशेष म्हणजे कारवाई करण्याआधी वाहतूक विभागाने पाच दिवसांपूर्वी विशेष पत्रक प्रसिद्ध करून रिक्षाचालकांना सुधारण्याची संधी दिली होती. वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या माध्यमातून एकत्रितपणे कारवाई करण्यात येत आहे. 

पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागात म्हणजेच पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर या चार तालुक्यांमध्ये रस्त्यावर दररोज 15 हजार रिक्षा धावतात. पनवेलमध्ये पनवेल शहर, कामोठे, कळंबोली आदी भागांत नागरिकांना रिक्षा मीटरप्रमाणे नाकारल्या जात असताना 1 फेब्रुवारीपासून करण्यात आलेल्या कारवाईत 1 आणि 2 फेब्रुवारी या दोन दिवशी 37 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. विविध कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 2 फेब्रुवारी रोजी 15 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे आणि प्रशांत शिंदे यांची दोन पथके स्थापन करून कारवाई केली जात आहे. तीन दिवसांत 52 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे.