पाणी बचतीसाठी विशेष भरारी पथके सक्रिय करा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 27, 2026
- 22
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश; हवा प्रदूषणावर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याच्या सूचना
नवी मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय रोखण्यावर भर द्यावा. यासाठी विभागस्तरीय विशेष भरारी पथकांनी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहून प्रभावी कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले. महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी पाणीपुरवठा, हवा प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणाबाबत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाचा सामना करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, अशा पद्धतीने जलनियोजन करावे. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी मदतयंत्रणा सक्षम ठेवावी, असे आयुक्तांनी सांगितले. आगामी कालावधीतील पाणीपुरवठ्याचे सर्वसमावेशक नियोजन करून त्याबाबत दोन दिवसांत विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या. बांधकाम प्रकल्प, सर्व्हिस सेंटर्स आणि कार वॉशिंग सेंटर्समध्ये केवळ प्रक्रिया केलेल्या पाण्याचाच वापर होतो की नाही, याची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले. नवी मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व बांधकाम साइट्सवर नियमित देखरेख ठेवून प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. हवा प्रदूषणाबाबत शून्य सहिष्णुता धोरण राबविताना महापालिकेच्या स्वतःच्या बांधकामांनाही समान कठोर नियम लागू करावेत, असे त्यांनी बजावले. न्यायालयाच्या निर्देशांनुसार सर्व बांधकाम साइट्सवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत की नाही, याचीही खातरजमा करण्यास सांगण्यात आले.दिवाळीत आवाजी फटाक्यांवर निर्बंधदिवाळीच्या काळात हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवाजी फटाक्यांवरील निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करावी. फटाके विक्रेत्यांना नियमांबाबत लेखी सूचना देण्यासोबतच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. अग्निशमन विभागानेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गासारख्या प्रमुख रस्त्यांवर नियमितपणे डीप क्लिनिंग मोहीम राबवावी. रस्ते स्वच्छ करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा, तसेच वर्दळीच्या चौकांमध्ये धूळ नियंत्रणासाठी तात्पुरत्या स्वरूपात कारंजे उभारण्याची शक्यता तपासावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. याशिवाय लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रलंबित कामे, तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारी, शिष्यवृत्ती व विविध योजनांची अंमलबजावणी तसेच आरोग्य आणि शिक्षण सुविधांचाही आयुक्तांनी आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करून सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश त्यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai