पालिका प्लास्टिकमुक्तचा दावा फोल!

पनवेल ः राज्यात पहिली प्लास्टिकमुक्त महापालिका म्हणून दावा करणारी पनवेल महापालिका ‘प्लास्टिकयुक्त’ असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या पथकाने शनिवारी पहाटे 6 वाजता पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत धाड टाकून अडीच टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. दोन लाख 25 हजार रुपये या प्लास्टिकची किंमत आहे. या कारवाईवरून पालिकेने केलेला प्लास्टिकमुक्तचा दावा फोल ठरल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. 

पनवेल शहरातील पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती या सरकारी आस्थापनेत व्यापारी सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करीत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा आल्या होत्या. पनवेल महापालिकेने प्लास्टिकविरोधी कारवाई पुन्हा सुरू केल्यानंतर शनिवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास धाड टाकण्यात आली. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड करण्यात आली होती. मध्यरात्रीपासून व्यावसायिकांची वर्दळ असलेल्या बाजार समितीत 100 व्यावसायिकांची झडती घेतल्यानंतर 45 किरकोळ आणि घाऊक व्यापारी ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देत असल्याचे समोर आले. बाजार समितीत अनेक वेळा जनजागृती मोहीम, कारवाई करूनही प्लास्टिक सर्रास वापरले जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी होण्यापूर्वी पनवेल महापालिकेने प्लास्टिकबंदी केल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महाराष्ट्रातील पहिली प्लास्टिकमुक्त महापालिका प्लास्टिकयुक्त असल्याचे या कारवाईवरून समोर आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यतिरिक्त म्हणजे कर्नाळा सर्कल, रोजबाजार, उरण नाका आदी ठिकाणीदेखील पहाटे 6 ते 11 वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली.