सफाई कामगारांना मिळणार थकीत बोनस

पनवेल : पूर्वी सिडकोमध्ये कार्यरत असलेले मात्र गेल्या 15 महिन्यांपासून पनवेल महानगरपालिकेकडे काम करणार्‍या 550 सफाई कामगारांना सिडकोकडून थकीत बोनस देण्यात येणार आहे. आझाद कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, लवकरच कामगारांच्या खात्यावर चार कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पनवेल महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन आणि त्याअगोदर साफसफाईच्या कामाच्या सेवा हस्तांतरित करून घेतल्या आहेत. नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे, तळोजा आणि नावडे येथील वसाहतींमध्ये सिडको प्राधिकरण या सेवा देत होते. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार काम करत होते. हे कामगार सेवा हस्तांतरानंतर पनवेल पालिकेकडे वर्ग करण्यात आले. मनपाने नियमित कामावर येणार्‍या कामगारांना महापालिकेत कंत्राटी पद्धतीने घेतले. साई गणेश या ठेकेदाराच्या अंतर्गत हे सफाई कामगार काम करत आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून महादेव वाघमारे हे लढा देत आहेत.

गेल्या 15 महिन्यांपासूनच्या पगारी सुट्ट्या, तसेच करारनामामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर सुविधा सफाई कामगारांना मिळाव्यात, यासाठी लढा सुरू आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही याविषयी याचिका दाखल केली आहे; परंतु त्याअगोदर सिडकोने कामगारांना बोनस दिला नव्हता. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आझाद कामगार संघटनेचा सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता. तसेच आंदोलनाचा इशारा देण्यात आला. याची दखल घेत सिडकोने सफाई कामगारांचा थकीत बोनस देण्याचे मान्य केले. त्यानुसार आरोग्य विभागाकडून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच कामगारांच्या खात्यावर बोनसची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. 

कामगारांच्या हक्कासाठी न्यायालयात दाद 

पनवेल महापालिका, सिडको महामंडळ, रेल्वेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या सफाई कामगारांच्या मूलभूत मागण्या मिळविण्यासाठी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.