Breaking News
भारतीय जनतेने मोदींना त्यांचे राजकारण करण्याची पद्धत आवडत नसल्याचा स्पष्ट संदेश निवडणुकीत मतपेटीद्वारे दिला. या संदेशातून मोदी सबका साथ सबका विकास या त्यांच्या मूळ अजेंड्याकडे वळतील अशी अपेक्षा सर्वाना होती. पण लोकसभा सभापती निवडणुकीत त्यांनी घेतलेल्या आडमुठी भूमिकेने जनतेच्या सर्व आशा फोल ठरल्या असून मोदींचा अहंकार तुसभरही कमी झाल्याचे जाणवत नाही. उलट त्यांच्या चेहऱ्यावरील खुनशी भाव पाहिले की, जाणवते देशात आगामी काळात विरोधकांवर संकटांची सुनामी तर येणार नाही ना आणि देश यादवीकडे तर जाणार नाही ना. याउलट विरोधीपक्ष मिळालेल्या अनपेक्षित यशातच मश्गुल असून येत्या काळात विरोधकांना मोदी कोणता कात्रजचा घाट दाखवतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. देशात नीटच्या पेपर फुटीचे पडसाद रस्त्यावर उमटत असून लाखो मुलांचे भवितव्य टांगणीला लागले असताना मोदींनी चकार शब्द काढलेला नाही किंवा सर्वपक्षीय बैठक बोलावून यातून तोडगा काढण्याचे प्रयत्न केला नाही किंवा रस्तावरील तरुणांचे साधे सात्वंनाही केले नाही. सर्व काही आयएएस अधिकाऱ्यांवर सोपवून स्वतः मात्र राजकारणाच्या सारीपाटावर कवड्या फेकत बसल्याने संतापाची लाट तरुणांमध्ये आहे. मोदींचा सुंभ जळाला तरी पीळ अद्याप कायम असल्याने जनतेने आता त्यांच्याकडून आशा न करणे हेच हिताचे असेल.
जनतेने मोदींना स्पष्ट बहुमत न दिल्याने सरकार स्थापनेसाठी मोदींना नितीश आणि नायडू यांच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागला आहे. निकालानंतर मोदी काही दिवस तरी स्वतःच्या स्वभावाला मुरड घालून सर्वाना सोबत घेतील असे वाटले होते. परंतु एवढे घडूनही मोदी-शहा यांनी गेल्या दोन दिवसात केलेल्या राजकीय हालचाली पाहता दोघांचाही दर्प कमी झाल्याचे जाणवत नाही. जखमी वाघ हा अधिक धोकादायक असतो तसेच मोदींचे झाले असून त्याचे भान विरोधकांनी ठेवले नाही तर येत्या काळात नायडूंचा तेलगू देसम, नितीश यांचा जनतादल युनायटेड, झारखंड मुक्ती मोर्च्याच्या अनेक खासदारांवर या वाघाचा पंजा कधी पडेल हे कळणार नाही. निर्णायक बहुमत मिळवण्यासाठी भाजपचे पुढचे लक्ष हे अखिलेश यादव असून त्यांच्याच पक्षाचा फडशा पाडण्याचा डाव भाजपने आखल्याचे बोलले जात आहे. केजरीवाल यांना ईडी नंतर सीबीआयने अटक केली आहे आणि त्यामुळे केजरीवाल जर लवकर बाहेर आले नाही तर आपचे पंजाबचे खासदार हे दुसरे भक्ष मोदींचे असेल. केजरीवालांना आत टाकून भविष्यात मोदींविरोधी आवाज उठवणाऱ्यांची काय भयंकर हालत होईल हा संदेश मोदींनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांना दिला.
देशातील सर्व विरोधक अपराजित मोदींना पराभूत करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकत्र आले. हे सर्वजण जरी एकत्र आले तरी जागावाटपावरून यांच्यात फूट पडेल अशी आशा मोदींना होती. सर्वानीच सामंजस्याची भूमिका घेत लोकसभेची निवडणूक लढवली आणि मोदींचा पहिला अंदाज हुकला. अखिलेश यांनी आखलेली रणनीती फळाला आल्याने मोदींचा अश्वमेध उत्तरप्रदेशात जरी लडखडला असला तरी त्याला ओरिसातून मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याने तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा योग पूर्ण झाला. मोदींना पूर्ण बहुमत न मिळाल्याने त्यांचा हा योग काही काळापुरता असेल असे जर कोणा विरोधकाला वाटत असेल तर विरोधक चुकीच्या भ्रमात आहेत म्हणून समजा. एकदा का बहुमत सिद्ध झाले कि मोदी पुढील सहा महिन्यात भाजपाला पूर्ण बहुमत मिळवून देतील हे नक्की. मोदी-शहा जोडगोळी कधीही एकाच प्लॅनवर विसंबून नसते तर त्यांचा प्लॅन बी-सी ते घेऊनच फिरत असतात. ते काय करणार त्याची भणक त्या दोघांशिवाय कोणालाच नसते हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. बहुमत मिळवण्याचा मोदींचा प्लॅन काय याचा सुगावा जर विरोधकांनी नाही लावला तर येत्या सहा महिन्यात मोदींकडे स्वतःचे निर्विवाद बहुमत असेल हे सांगावयास कोण्या कुरबुड्या ज्योतिषीची गरज नाही. त्यामुळे जखमी वाघाचे पुढचे लक्ष कोण? हे समजणे तितकेच अवघड आहे.
2024 च्या लोकसभा निवडुकीतून देशाला गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा विरोधी पक्षनेता मिळाला. काँग्रेसमुक्त भारत हा नारा देणाऱ्या मोदींसाठी हा धक्का आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात विरोधी पक्षनेताच काय उपसभापती देखील निवडू दिला नाही. काँग्रेसला आवश्यकतेपेक्षा खासदार कमी मिळाले तरी सर्वसमावेशक राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी विरोधीपक्ष नेताच निवडला नाही. विरोधीपक्ष नेता नाही या सबबीवर त्यांनी जनलोकपाल निवडला नाही. आपल्यावर कोणाचाच अंकुश नको हा त्यामागचा मोदींचा उद्देश असावा. गेल्या 75 वर्षात सभापतीपद सत्ताधारी तर उपसभापतीपद हे विरोधीपक्षाला देण्याची परंपरा आहे. पण राजकारणात कोणतीच परंपरा कायम नसते, आपण घालू तीच परंपरा अशी मोदींची कार्यपद्धती असल्याने यावेळीही ते उपसभापती निवडणार नाहीत हे तितकेच खरे. भविष्यात तशी जरी वेळ आली तरी विरोधकांना कोणतीच संधी न देता तेथेही मोदी आपलाच नेता बसवतील हेही कटू सत्य आहे. आपले इस्पित साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक राजकारण कसे करू नये याचा हा उत्तम परिपाठ त्यांनी देशाला घालून दिला आहे. परंतु या विरोधक विरोधी राजकारणाकडून आपण एकाधिकारशाही राजकारणाकडे चाललो आहोत याचे भान सर्वानी ठेवले पाहिजे नाहीतर भारतासारख्या खंडप्राय देशाला विखंडित करायला वेळ लागणार नाही.
बहुमत नाही हे ऐकून आपल्याला कसे वाटत असेल तर मोदीं हे कटू सत्य कसे स्वीकारत असतील याची कल्पना करवत नाही. महिन्याभरापूर्वी कोण राहुल म्हणून पत्रकारांना प्रश्न विचारणारे मोदी आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन करताना देशाने पहिले. किती यातना त्यांच्या मनाला झाल्या असतील. मोदींचा उतरलेला चेहराच त्यांचे अंतर्मन दाखवत असून ते कोणता विचार करत असतील हे सांगायला तज्ज्ञांची गरज नाही. सर्वात प्रथम विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी घालवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न त्यांच्याकडून होईल हे निश्चित. त्यातच प्रियांका वायनाड मधून निवडणूक लढवणार अशी घोषणा झाल्याने मोदी निश्चित कावरेबावरे झाले असणार. या लोकभेच्या निवडणुकीच्या प्रचारात मोदींना जर कोणी हजरजबाबी उत्तर दिले असेल ते प्रियंका गांधींनी. त्यामुळे लोकसभेत मोदींना प्रखर भाषणांनी प्रियांका गांधींनी निरुत्तर केल्यास देशात मोदींना पर्याय मिळाल्याचा संदेश सर्वत्र जाईल हेच मोदींना नको असेल. आजही इंदिरा गांधींची छबी म्हणून प्रियांका गांधींकडे पहिले जाते. त्यामुळे प्रियांका लोकसभेत येणे हे भाजपासाठी नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे.
बहुमत जमवण्यासाठी मोदी कोणतेही अस्र वापरतील. नायडू-नितीश यांचे खासदार गळाला लावण्याचा प्रयत्न करतील पण नितीश-नायडू असा घोष करत ते अखिलेशचा कधी काटा काढतील याचा नेम नाही. उत्तरप्रदेशमध्ये भाजपाची सत्ता असल्याने साम, दाम, दंड हि अस्त्रे तेथे वापरणे सहज शक्य आहे. त्यामुळे येत्या काळात उत्तरप्रदेशातून ऑपेरेशन लोटस सुरु झाल्यास आश्चर्य वाटावयास नको. आपचे पंजाब मधील खासदार हे दुसरे लक्ष असेल. एकनाथ शिंदे यांचा विजयी दर भाजपापेक्षा सरस ठरल्याने तूर्तास राज्याच्या निवडणुकीपर्यंत अभय राहील. चिराग पासवान हे जरी भाजप सोबत असले तरी बहुमतासाठी त्यांचाही बळी घेण्याची शक्यता आहे. खरं तर निकालानंतर मोदी सामंजस्याने वागतील अशी अपेक्षा सर्वाना होती पण भुका शेर घास खात नाही हे त्यांना विरोधकांना दाखवून द्यायचे असल्याने कोणालाच न जुमानता ओम बिर्ला याना सभापतीपदी बनवलेच. गेल्या दहा वर्षातील चुका सुधारण्यासाठी एक चांगली सुरुवात करण्याची संधी त्यांनी यावेळी दवडली.. सुंभ जळाला पण पीळ नाही गेला म्हणतात ते हेच...
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे