शहरातील पाणीकपात मंजूर नाही
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 02, 2024
- 369
आ.गणेश नाईक यांचा पालिका प्रशासनाला खडेबोल
नवी मुंबई : स्वतःचे धरण असल्याने चोवीस तास पाणीपुरवठा करणारे शहर म्हणून नवी मुंबई ओळखली जाते. मात्र अशा जलसंपन्न शहरात सध्या सुरु असलेली पाणीकपात आम्हाला मंजुर नसून नवी मुंबईकरांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे असा सूचनावजा इशारा आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबई शहरात पाणीकपात सुरु केली आहे. विभागवार आठवड्यातील 3 दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा कपात केला जातो. त्यामुळे एकवेळ पाणी येत असल्याने नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याअनुषंगाने आ. नाईक यांनी पालिका आयुक्तांबरोबर मंगळवारी झालेल्या नियमित बैठकीत पाणीकपातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्याला देवू केलेले पाणी आपण घेत नाही, इतरांना दिलेल्या पाण्यात कपात करत नाही आणि नवी मुंबईकरांना पाणीकपात करुन तहानलेले ठेवायचे हे योग्य नाही. नवी मुंबईला बारवी धरणातून मिळणारा हक्काचा पाणी कोटा मिळत नाही. एमआयडीसीकडून नवी मुंबईला हक्काचे दररोज 80 दशलक्ष लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. परंतु एमआयडीसीकडून फक्त 65 एमएलडी पाणी मिळते. त्यामुळे मोरबे धरण नवी मुंबईकरांचे धरण असून धरणातून सर्वप्रथम नवी मुंबईला पुरेल एवढा पाणीपुरवठा झाला पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या हक्काचे पाणी अन्यत्र वळवू नका असा इशाराच त्यांनी पालिका प्रशासनाला दिला. झोपडपट्टी, गाव, गावठाण, शहर सर्वच भागात समान पद्धतीने पाण्याचे वितरण करावे अशा सूचना नाईक त्यांनी केल्या. एकीकडे पावसाने ओढ दिली असून पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी पालिकेने शहरात मागील काही दिवसांपासून पाणीकपात सुरू केली आहे. त्यामुळे शहरात कमी-अधिक प्रमाणात पाणीकपातीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
आजच्या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai