Breaking News
आ.गणेश नाईक-आ. मंदा म्हात्रे यांचा मागील दाराने पुनर्वसनाचा घाट
नवी मुंबई ः महायुतीत जागावाटपाची बोलणी सुरु असून ऐरोली आणि बेलापूर मतदार संघापैकी ऐरोली मतदारसंघावर शिंदे सेनेने दावा ठोकला आहे. ऐरोलीतून विजय चौगुले आणि बेलापूर मतदार संघातून संदीप नाईक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. संदीप नाईक यांनी नुकतेच बेलापूर मतदारसंघात आपले कार्यालय उघडले असून यावरून ताई आणि दादांचे पुनर्वसन मागल्या दाराने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधासभेचे अधिवेशन संपले असून आता सर्वाना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने चिंतन बैठका सुरु असून सर्वच पक्षांनी आपापले दावे ठोकायला सुरुवात केली आहे. महायुतीत 160 जागा भाजप लढवणार आणि उर्वरित जागा एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला वाटून देण्याची चर्चा प्रसारमाध्यमांवर जोरात रंगली आहे. त्यातच महाविकास आघाडीतही उद्धव ठाकरे यांना 120-125 जागा देऊन उर्वरित जागा शरद पवार आणि काँग्रेस पक्ष यांच्यात वाटून घेण्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे 151 जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचे सेनेतील सूत्रांकडून कळत आहे.
दरम्यान नवी मुंबईतील ऐरोली-बेलापूर मतदार संघ कुणाच्या वाट्याला जातात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत गणेश नाईक यांना तिकीट न देता भाजपने संदीप नाईक यांना उमेदवारी दिली होती. पण संदीप नाईक यांनी ती गणेश नाईक यांना दिली. त्यामुळे गणेश नाईक यांची मागील निवडणूक हि शेवटची निवडणूक समजली जात होती. एका घरात दोन तिकीट न देण्याचे धोरण भाजपचे असून यावेळी संदीप नाईक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे संदीप नाईक यांना ऐरोलीतून कि बेलापूर मतदार संघातून उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऐरोली मतदार संघावर शिंदे सेनेने दावा ठोकला असून तेथून निवडणूक लढवण्याची तयारी विजय चौगुले यांनी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे सेनेचे पारडे जड झाल्याने त्यांची ऐरोली मतदार संघाची मागणी मान्य होईल हे नक्की मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी भाजपला पूर्णपणे जोखले असून यावेळी ते पाहिजे त्या जागा पदरात पाडून घेण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे त्यांनी ऐरोलीची तयारी सुरु केली असून हि जागा पदरात पडली नाही तर बंडखोरांच्या मार्फत दोन्ही मतदार संघात मैत्रीपूर्ण लढतीची तयारी ठेवली आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांचे काय करायचे हा प्रश्न भाजपपुढे आहे. गणेश नाईक यांचा फिटनेस पाहता त्यांनी निवडणूक लढायचे निश्चित केले तर मात्र पंचाईत होईल हे जाणून त्यांना व ताईंना मागल्या दाराने विधानपरिषदेवर पाठवण्याचा प्लॅन बी तयार ठेवल्याचे सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान गणेश नाईक त्यास कसा प्रतिसाद देतात त्यावर या दोन्ही जागांचे भवितव्य अवलंबून आहे. आमदार मंदा म्हात्रेही सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून असून त्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया संदीप नाईक यांच्या कृतीला दिली नसल्याने आगामी काळात नवी मुंबईत कोणती राजकीय उलथापालथ होते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai