स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन झाले सुलभ

नवी मुंबई ः अर्जदारांना आपल्या स्वप्नाच्या घराचा ताबा घेण्यापूर्वी मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरून नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया पार पाडावी लागते. यासाठी अर्जदारांना लागणार्‍या वेळेत कपात व्हावी व जलद गतीने ही प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय सूचना-विज्ञान केंद्र यांच्यातर्फे ळ-डरीळींर सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. 

या सॉफ्टवेअरच्या वापराचा शुभारंभ सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते 10 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आला. या वेळी सिडको गृहनिर्माण योजनेत सदनिका प्राप्त झालेल्या अर्जदाराचे नोंदणी शुल्क या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन भरण्यात आले. या सॉफ्टवेअरमुळे अर्जदारांना त्यांची सदनिका अथवा दुकान मिळवण्याआधीची मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरून नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया जलद गतीने होऊन लवकरात लवकर त्यांच्या सदनिकेचा अथवा दुकानाचा ताबा मिळवणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे सदर सॉफ्टवेअरचा वापर महाराष्ट्रात प्रथमतः सिडकोतर्फे करण्यात येत असल्याने महामंडळासाठी ही विशेष अभिमानाची बाब आहे, असे मत लोकेश चंद्र यांनी सॉफ्टवेअर वापराच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केले.  

या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अर्जदारांना ऑनलाइन माध्यमातून एकाच ठिकाणाहून मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरून करारनामा नोंदणीकृत करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात सिडकोतर्फे विक्री करण्यात आलेल्या सदनिका व दुकानांचे करारनामे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोयीमुळे नागरिकांना आपल्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता, सिडको महामंडळाच्या कार्यालयातूनच ई-रजिस्ट्रेशन करता येणार आहे. सदर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आजतागायत आठ राज्यांमध्ये सुमारे 15 लाख कागदपत्रे नोंदणीकृत करण्यात आली असून, सिडकोच्या सदनिका व दुकाने खरेदी केलेल्या अर्जदारांनादेखील याचा निश्चितच फायदा होणार आहे.