Breaking News
नेमबाजीत महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक
मुंबई : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात की, स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकविले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदन, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. तसेच त्याला स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai