Breaking News
संचालक मंडळाची पीपीपी तत्वावर प्रकल्प उभारण्यास मंजुरी
नवी मुंबई : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून ऐरोली येथे 27.30 हेक्टर जमिनीवर टाऊनशिप उभारण्याच्या प्रस्तावास सिडको संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. शासनाच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून जो विकासक ज्यास्त महसुल देईल त्यालाच हे काम देण्याचा निर्णय सदर ठरावात नमुद आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी घरे बांधल्यानंतर आता उच्च उत्पन्न घटकांसाठी ही योजना राबवण्याचे सिडकोचे धोरण असल्याची चर्चा आहे.
सिडकोने सध्या नवी मुंबईत भुखंड विक्रिचा सपाटा लावला आहे. सिडकोच्या या भुखंड विक्रिमुळे बाजारात प्रचंड घरे उपलब्ध असून त्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी बांधलेल्या घरांचाही समावेश आहे. सिडकोने ऐरोलीतील सेक्टर 10 येथे 27.30 हेक्टर जमिनीवर सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी ही जमिन सिडकोने आंतरराष्ट्रीय दुतावासांसाठी राखीव ठेवली होती. परंतु, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने नंतर या जागेवर थिम सिटी विकसीत करण्याचे ठरवले होते. परंतु, आता सिडकोने या जागेवर टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेऊन तो ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.
सिडकोने हा निर्णय देशातील नामवंत उद्योजकाला नजरेसमोर ठेवून घेतला असल्याची चर्चा सध्या सिडकोत आहे. आजवर सिडकोने अशापद्धतीची कोणतीही योजना राबवली नसल्याने व तसा अनुभव गाठीशी नसल्याने सिडकोचा अधिकारी वर्ग धास्तावला आहे. सिडकोचा कारभार सध्या नगरविकास मंत्र्यांच्या जवळ असलेल्या काही व्यक्तींमार्फत होत असल्याचे बोलले जाते. पनवेलमधील मौजे वळवली येथील सिडकोच्या 36 हेक्टर जमिनीवरील आदिवासी कुटुंबीयांची अतिक्रमणे नियमानुकूल करून स्वतःची दोन हजार कोटींची जमीन वगळण्याचा तुघलकी निर्णय सिडकोने गेल्या वर्षी घेतला याबाबत उलटसुलट चर्चा सध्या मंत्रालयात आहे. पाच वर्षांत नवी मुंबईत सिडको व खाजगी विकासकांची अनेक घरे विक्रीविना पडून आहेत. शिवाय नैना क्षेत्रात नगररचना परियोजनेअंतर्गत 12 शहरे अर्थात टाउनशिप प्रस्तावित आहेत. ही वस्तुस्थिती असताना पीपीपी तत्त्वावरील टाउनशिपचा अट्टाहास कोणाच्या फायद्यासाठी केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai