लाडकी बहिणवरुन महायुतीत रुसवा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 14, 2024
- 493
फडणवीस-पवार यांना मुख्यमंत्री शब्दाची ॲलर्जी
मुंबई ः लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर जागे झालेल्या महायुती सरकारने मध्यप्रदेश सरकारची लाडली बहन योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात सुरु केली. या योजनेसाठी अडीच कोटी महिलांनी नोंदणी केल्याने श्रेयाच्या लढाईत फडणवीस व पवार यांनी लावलेल्या बॅनरवरुन ‘मुख्यमंत्री' शब्द गायब केल्याने महायुतीत रुसवा असल्याची चर्चा रंगली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारची महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली. त्याचा फटका केंद्रात सरकार स्थापन करण्यास झाल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत ही ुपिछेहाट कशी भरुन काढावी या चिंतेत महायुतीचे नेते होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौव्हान यांनी राज्यात भाजप सरकारविरुद्ध नकारात्मक वातावरण असताना लाडली बहन ही योजना सुरु केली. या योजनेत महिलांना सुरुवातीला 300 रुपये व टप्प्याटप्यात ते 1000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. लोकसभा निवडणुकीत या योजनेचा मोठा फायदा भाजपला होऊन मध्यप्रदेशमधून लोकसभेच्या सर्व जागा जिंकल्या.
या योजनेचा महिला मतदारांवर होणारा परिणाम विचारात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थविभागाचा विरोध डावलून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत महिलांना महिना 1500 रु. देण्यात येणार असून ही योजना 1 जुलैपासून अमंलात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. या योजनेच्या लाभासाठी महिलांची प्रचंड गर्दी नोंदणी केंद्रांवर लागली असून सरकारने ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. ज्या महिलांनी नोंदणी केली आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट चे 3000 रुपयांचे मानधन देण्यात आले आहे. सूमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेअंतर्गत नाव नोंदवल्याने महायुतीतच श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. भाजप आणि अजित पवार यांच्या या योजनेच्या जाहिरातीच्या बॅनरवरुन मुख्यमंत्री हा शब्द गायब झाल्याने शिंदेसेनेमध्ये अस्वस्थता आहे. ही योजना सरकारची असल्याने मुख्यमंत्री शब्द काढणे अनुचित असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेनेच्या अनेक नेत्यांनी दिली आहे. तरीही या सूचनेकडे दुर्लक्ष करुन महायुतीतील घटक पक्षांनी बॅनरबाजी सुरु ठेवल्याने महायुतीत रुसवा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, लाडकी बहिणीच्या या योजनेचा फायदा महायुती सरकारला किती मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai