स्पॅगेटीतील इमारतींच्या पिलरला तडे

पनवेल : सिडकोने उभारणी केलेल्या खारघर सेक्टर 15 मधील स्पॅगेटी हौसिंग सोसायटीच्या पिलरला तडे गेल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी के 4 बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरील सज्जा अचानक कोसळला. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सदनिकांचा ताबा घेऊन पंधरा वर्षे झाले आहेत. मात्र या काळात इमारतींना अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यामुळे रहिवासी चिंतेत आहेत.

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराची उभारणी करण्यात आली. वसाहती उभारण्यात आल्या. परंतु सिडकोच्या माध्यमातून बांधलेल्या इमारती अल्पावधीतच निकृष्ट ठरल्या. अवघ्या पंधरा-वीस वर्षांत या इमारतींची पडझड सुरू झाली. अनेक इमारतींच्या भिंतींना तडे गेले आहेत. प्लास्टर निखळण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. 2005 मध्ये रहिवाशांनी स्पॅगेटीतील गृहप्रकल्पाचा ताबा घेतला. या ठिकाणी गृहप्रकल्पात जे, के, एल, एम अशा चार विंग आहेत. चार विंगमध्ये एकूण 18 इमारती असून एकूण 456 सदनिका आहेत. सध्याच्या घडीला हजारो रहिवासी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र एवढ्या कमी वेळात इमारतींच्या पिलरला तडे गेल्याने रहिवासी कामाच्या दर्जाबाबत संभ्रमात आहेत. सिडकोने गृहप्रकल्प उभारताना रहिवाशांना विविध आश्वासने दिली होती. त्यामध्ये कामाचा दर्जा ही महत्त्वाची बाब होती. मात्र इमारतींच्या पिलरला ठिकठिकाणी तडे गेल्याने 2012 मध्ये स्पॅगेटी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमार्फत सिडकोसोबत पत्रव्यवहार केले होते. या वेळी सिडकोने स्ट्रकवेल डिझायनर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला तात्पुरत्या स्वरूपात तडे बुजविण्याचे काम दिले होते. हे काम पूर्ण झाल्यावर अवघ्या सात वर्षांत पुन्हा एकदा स्पॅगेटी सोसायटीतील इमारतींच्या पिलरला तडे गेल्याने रहिवाशांनी सोमवारी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकार्‍यांना पत्रव्यवहार करून दखल घेण्याची विनंती केली आहे. गृहप्रकल्पाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी केली असून यापूर्वीही रहिवाशांनी ही मागणी केली होती. या प्रस्तावित गृहप्रकल्पांच्या उभारणीत तरी सिडकोने बांधकामांचा दर्जा राखावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.