हिरानंदानी समुहास शर्तभंगासाठी 42.97 कोटी दंडाची नोटीस
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 27, 2024
- 444
ठाणे ः हिरानंदानी समुहाच्या मे. रोमा बिल्डर्स प्रा. लि. या कंपनीने कोलशेत व कावेसर येथील नगर वसाहत प्रकल्प विकसीत करताना 61,410 चौ.मी. क्षेत्रावर शर्तभंग केल्याचा ठपका महसुल विभागाने ठेवला आहे. शर्तभंग म्हणून विकासकावर 42.97 कोटी रुपये नजराणा आकारला असून याबाबत कागदपत्रासह म्हणणे मांडण्याची सूचना तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या आदेशाने बजावली आहे.
ठाणे येथे हिरानंदानी समुहातील मे. रोमा बिल्डर्स प्रा.लि. ही कंपनी मौजे कोलशेत व कावेसर येथे विशेष नगर वसाहत विकसीत करत आहे. सदर प्रकल्पाला शासनाने 2009 मध्ये लोकेशन क्लिअरन्स व ठाणे महानगरपालिकेने इरादापत्र दिले आहे. शासनाने मे. रोमा बिल्डर्स प्रा.लि. यांना या प्रकल्पाअंतर्गत असलेल्या सूमारे 69.78 एकर शासकीय जमिनी सूमारे 120 कोटी रुपये अधिमुल्य आकारुन विशेष नगर वसाहतीसाठी अटी व शर्तींसह दिल्या होत्या. या प्रकल्पाला सहसंचालक नगररचना कोंकण विभाग यांनी 2010 व 2017 मध्ये मंजुऱ्या प्रदान केल्या आहेत. सदर वसाहत हिरानंदानी इस्टेट म्हणून राज्यात ओळखली जात असून ठाण्यात या वसाहतीत राहणे प्रतिष्ठेचे समजले जाते.
या प्रकल्पात मे. रोमा बिल्डर्स प्रा.लि. यांनी कोलशेत येथील शासकीय जमिन सर्वे नं. 182/4, 279 व 299 चे एकुण क्षेत्र 61,410 चौ.मी. समाविष्ट केली आहे. परंतु, सदर जमिनी या भोगवटादार वर्ग 2 या संवर्गात मोडत असल्याने या जमिनींचा वापर करण्यापुर्वी त्या जमिनी शासनाच्या परवानगीने भोगवटादार वर्ग-1 मध्ये परिवर्तित करुन मगच त्याचा वापर करणे महाराष्ट्र जमिन महसुल व कुळ कायद्याअंतर्गत बंधनकारक आहे. या जागेवर मे. रोमा बिल्डर्स प्रा. लि.यांनी शाळा बांधुन ती जमिन इमारतीसह न्यु होरायझन एज्युकेशन सोसायटीला 99 वर्षाच्या भाडेपट्टयाने शासनाच्या परवानगीशिवाय दिली. त्याचबरोबर उर्वरित क्षेत्रावर माहिती व तंत्रज्ञान अंतर्गत बांधकाम करुन सदर जागा टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस यांना 2019 साली भाडेकराराने दिली. न्यु होरायझन सोसायटीने सदर मिळकतीवर इंडसइंड बँक लि. कडून 75 कोटी रुपयांचे कर्ज घेतले व सदर जमिन बँकेकडे गहाण ठेवली.
परंतु, शासनाची परवानगी न घेताच भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीवर बांधकाम करुन प्रकल्प प्रवर्तक मे. रोमा बिल्डर्स प्रा.लि. यांनी सदर जमिन परस्पर भाडेपट्याने दिली आणि न्यु होरायझन एज्युकेशन सोसायटीने त्यांची बांधकामासह जमिन गहाण ठेवली याबाबत अनेक तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. याबाबत तत्कालीन महसुल मंत्री यांच्याकडे सुनावणी होऊन 3 मार्च 2022 रोजी 61,410 चौ.मी. क्षेत्रापैकी 11,717.62 चौ.मी. क्षेत्रावर मुल्यांकनाच्या 75 टक्के शर्तभंगाची नजराणा रक्कम रुपये 6 कोटी 33 लाख 6 हजार 123 वसुल करुन शर्तभंग नियमानुकूल करण्याचे आदेश तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. त्या अनुषंगाने मे. रोमा बिल्डर्स प्रा. लि. यांनी 6 कोटी 33 लाख रुपये शर्तभंग म्हणून शासनाला जमा केले होते. परंतु, शर्तभंग हा संपुर्ण 61,410 चौ.मी. क्षेत्रावर झाला असल्याने संपुर्ण जमिनीवर शर्तभंग नजराणा वसूल होणेसाठी जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे यांनी याबाबत 65 कोटी 74 लाख 72 हजार रुपये शर्तभंग झाल्याचे निश्चित करुन त्याच्या 75 टक्के रक्कमेतून यापुर्वी भरलेली 6 कोटी 33 लाखांची रक्कम शासनाला जमा करण्याबाबत मे. रोमा बिल्डर्स प्रा.लि. यांना नोटीस बजावली आहे. याबाबत कागदपत्रांसह म्हणणे मांडण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे हिरानंदानी समुहाला याप्रकरणी कोणते म्हणणे मांडते व जिल्हाधिकारी ठाणे कोणता आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- विनापरवाना जमिन गहाण
शासनाची परवानगी न घेताच भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीवर बांधकाम करुन प्रकल्प प्रवर्तक मे. रोमा बिल्डर्स प्रा.लि. यांनी सदर जमिन परस्पर भाडेपट्याने दिली आणि न्यु होरायझन एज्युकेशन सोसायटीने त्यांची बांधकामासह जमिन गहाण ठेवली याबाबत शर्तभंग प्रकरणी शासनाचा दंड - आयटीचे बांधकाम नियमबाह्य
विकसकाने शर्तभंग करुन विशेष नगर वसाहतीत केलेले माहिती व तंत्रज्ञान बांधकाम नियमबाह्य ठरवून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा अहवाल संचालक नगररचना पुणे यांनी शासनास सादर केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai