जमिनींच्या होल्डचे रहस्य कधी होणार फ्री
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2024
- 401
राजकीय नेत्यांच्या विजयवादात नवी मुंबईकर संभ्रमात
नवी मुंबई ः नवी मुंबईतील सिडको मालकीच्या जमिनी फ्री होल्ड झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्याने नवी मुंबईत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. परंतु, या निर्णयाचा अधिकृत खुलासा सिडको अथवा शासनाकडून न झाल्याने राजकीय नेत्यांच्या विजयवादाच्या श्रेयामुळे नवी मुंबईकरात पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसात शासननिर्णय जाहीर करु असे स्थानिक नेते सांगत असले तरी गेली 30 वर्ष राजकर्त्यांच्या आश्वासनावर झुलत असलेल्या नवी मुंबईकरांना जमीनींच्या होल्ड चे रहस्य कधी फ्री होणार याची प्रतिक्षा आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय नाहटा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सिडको संचालक मंडळाने जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतल्याने जाहीर केले. याबाबत सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाट यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत या निर्णयाला दुजोरा दिला. त्याचवेळी सिटीझन फाऊंडेशनच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सिडकोने हस्तांतरण शुल्क रद्द केल्याचे जाहीर केले. याबाबत सिडको संचालक मंडळाचा ठराव येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुर झाल्यावर त्याचा शासननिर्णय जाहीर करण्यात येईल असे दोन्ही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय नाहटा यांनी सर्व प्रसारमाध्यमांना पानभर जाहीरात देऊन लोकांना या निर्णयाबाबत अवगत केले.
सिडको घेत असलेले हस्तांतरण शुल्क रद्द व्हावे म्हणून गेली अनेक वर्ष मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे. यापुर्वी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली होती. परंतु, त्यावेळी न्यायालयाने कौल सिडकोच्या बाजुने दिल्याने गेली अनेक वर्ष सिडकोकडून नाडला जात असल्याची नवी मुंबईकरांची भावना आहे. गेल्या चार महिने नवी मुंबईतील सिटीझन फाऊंडेशन, हाऊसिंग फेडरेशन, नवी व्यापारी महासंघ आणि सहकार भारती या सामाजिक संघटनांनी याबाबत आवाज उठवला होता. त्यामुळे सिडकोच्या विरोधात चांगले जनमत तयार झाले होते. सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड कराव्या अशी मागणी स्थानिक आमदार गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे यांनी अनेक वर्ष सरकारकडे लावून धरली होती. परंतु, सिडकोचे यामध्ये मोठे अर्थकारण असल्याने सिडको पर्यायाने सरकारही जमिनी फ्री होल्ड करण्यास आणि हस्तांतरण शुल्क रद्द करण्यास राजी नाही. यापुर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भुषण गगराणी यांनी जमिनी फ्री होल्ड करण्याची भुमिका घेतली असता त्यास सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला.
परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय घेण्याचे सुतोवाच यापुर्वी केले होते. त्यानुसार नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाट यांनी याबाबत सिडकोने संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया दिली असली तरी याबाबत सिडकोकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा व प्रतिक्रिया न आल्याने नवी मुंबईकरांत संभ्रम आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊन शासननिर्णय जाहीर होईल असे जरी सांगण्यात येत असले तरी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
- नवी मुंबईकर मालक बनणार
सिडको संचालक मंडळाने नवी मुंबईसह राज्यातील सिडकोच्या सर्व जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देेशावरुन हा निर्णय घेतला असल्याने राज्याचे मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल. या निर्णयामुळे सिडकोच्या जमिनीवर भाडेपट्ट्याने राहणारे आता मालक बनणार आहेत. त्यांना कोणताही हस्तांतरण शुल्क द्यावे लागणार नाही. - संजय शिरसाट, सिडको अध्यक्ष
गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीत मार्गी लावला आहे. नवी मुंबईकरांची यामुळे सिडकोच्या जाचातून मुक्तता झाली आहे. नवी मुंबईकरांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. - विजय नाहटा, शिवसेना शिंदे गटाचे नेते
- कायदेशीर अडचण
सिडको संचालक मंडळाने जरी भाडेपट्ट्याच्या जमिनी फ्रि होल्ड करण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्याच्या मंत्रिमंडळाची त्यास मान्यता आवश्यक आहे. त्यानंतर सदर जमिनी फ्रि होल्ड करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमात बदल करावे लागणार आहेत. त्यास राज्याच्या दोन्ही सभागृहांची मान्यता आवश्यक असेल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai