Breaking News
चर्चेचा विषय आणि गाण्याची अवीट गोडी जपणार्या सिनेमाच्या यादीत ‘अजिंक्य’ सिनेमाचं नाव घेतलं जात आहे. या सिनेमात तरुणाईची नेमकी नस ओळखून आजचे विषय मांडण्यात आले आहेत. आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणार्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा नायक ‘अजिंक्य’च्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे. ल्युमिनरी सिने वर्ल्ड निर्मित आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. यांची प्रस्तुती असलेला ‘अजिंक्य’ सिनेमा येत्या 20 मार्च 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अरुणकांत शुक्ला, राघवेंद्र के. बाजपेयी, नीरज आनंद, बाबालाल शेख, राहुल लोंढे आणि वेद पी. शर्मा यांची निर्मिती असलेल्या अजिंक्य या सिनेमाचं दिग्दर्शन अ. कदिर यांनी केलं असून कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत. या सिनेमांचे संगीत दिग्दर्शन रोहन - रोहन या प्रसिद्ध संगीतकार जोडगोळीने केलं आहे. या सिनेमाबद्दल सांगताना रोहन गोखले म्हणाले, आजकाल सिनेमाच्या टिझर वा ट्रेलर पेक्षा सिनेमाची गाणी देखील मोठ्या प्रमाणावर पाहिली जातात. जी सिनेमाचा फस्टलूकही ठरु लागली आहेत. त्यामुळे सिनेमा तयार करणार्या निर्माता दिग्दर्शकाप्रमाणे आमच्यावरही संगीतकार म्हणून मोठी जबाबदारी असते. गाण्यांचे शब्द, त्याचं संगीत याच्याकडे प्रेक्षकांचं बारीक लक्ष असतं. असं संगीत ज्यावेळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं तेव्हा त्यांच्याकडून येणारा प्रतिसाद संगीतकारासाठी लक्षवेधी ठरतो. ‘अजिंक्य’ सिनेमातील चारही गाणी आम्हाला असाच लक्षवेधी प्रतिसाद देतील असा विश्वास आहे. सिनेमातील वेगवगळ्या धाटणीची चार गाणी कथेच्या प्रवासाला सुकर करणारी आहेत. गीतकार किरण कोठावडे यांनी लिहिलेले ‘अलगद अलगद’ हे रोमँटिक साँग गायक रोहन प्रधान आणि मीनल जैन यांनी गायलं आहे. गायक रोहन गोखले यांच्या दमदार आवाजातील ’’स्वप्नांना...’’ हे मोटिव्हेशनल गाणं जय अत्रे याने लिहिलं आहे. ताल धरायला लावणारं गायिका प्राजक्ता शुक्रे हिच्या ठसकेबाज आवाजातील माझे फेव्हरेट राव हे आयटम साँग गीतकार जय अत्रे याच्या लेखणीतून उतरलं आहे. मनाला भिडेल असं ‘आता तरी बोल ना’ हे भावनिक गाणं मनोज यादव यांनी लिहिलेलं असून गायक सुरज जगन आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. या सिनेमाचे छायांकन माधवराज दातार आणि दीपक पवार, संकलन रोहित म्हात्रे आणि विनायक कोंडे, पार्श्वसंगीत सलील अमृते, सहदिग्दर्शक उमेश नार्वेकर, कार्यकारी निर्माता सचिन यादव, कला सचिन पाटील, नृत्यदिग्दर्शन अर्जुन गायकवाड, वेशभूषा अनुजा जैस्वाल आणि रंगभूषा सुनील शेडगे यांनी केली आहे. झक्कास गाणी आणि दमदार कथेचा उत्तम मेळ असणारा अजिंक्य हा सिनेमा 20 मार्च 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai