Breaking News
425 कोटी खर्च करुन नेमलेल्या सल्लागाराच्या डिझाइनवर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई ः सिडकोने नैना क्षेत्रात निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 6 हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. या कामांची निविदा सल्लागार मे. हितेश सेठी ॲण्ड असोसिएट्स यांनी बनवली आहे. या कामांमध्ये 40% काम हे प्रीकास्ट पावसाळी गटाराचे घेण्यात आले आहे. या गटारांचे हायड्रॉलिक डिझाइन सिडकोच्या नैना अभियांत्रिकी विभागाकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर माहिती अधिकारात दिले आहे. त्यामुळे सिडकोच्या नैना विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे.
सिडकोने नैनाचा विकास करण्यासाठी मे. हितेन सेठी आणि असोसिएट्स यांना सल्लागार नेमले आहे. या सल्लागाराच्या अनमोल सल्ल्यापोटी सिडकोला 425 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. सिडकोच्या नियोजन विभागाने यापुवच नैना क्षेत्रातील टिपीएस 1 ते 12 योजनांना पुर्णतः मंजुरी शासनाकडून घेतली आहे. त्यामुळे यापुवच सिडकोच्या नियोजन विभागाने नैना क्षेत्राचे नोडल प्लॅन बनवले असताना पुन्हा सल्लागार नेमण्याची गरज काय? असा मतप्रवाह सध्या सिडकोत आहे.
सल्लागार हितेन सेठी यांनी सिडकोच्या नियोजन विभागाने बनवलेल्या टिपीएस 2 ते 12 योजनेत रस्ता विकासाची आणि पावसाळी गटारे बनवण्याची निविदा प्रक्रिया राबवून आयत्या पिठावर रेगोट्या मारल्याची चर्चा आहे. या कामामध्ये सूमारे 40%हून अधिक पावसाळी गटारे बांधण्याचे काम असून ही कामे प्रिकास्ट काँक्रिटद्वारे करण्यात येणार आहे. या कामासाठी सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटचे दरसूची वापरण्यात आली आहे. ही दरसूची वापरण्यासाठी सल्लागाराने सिडकोची मंजुरी घेतली नसल्याचे नैनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सिडकोने आतापर्यंत 8 कंत्राटदारांना सूमारे 6 हजार 250 कोटींची कामे दिली असून त्यामध्ये अंदाजे 2000 कोटींचे पावसाळी गटार बांधण्याच्या कामाचा समावेश आहे.सदर, पावसाळी गटाराचे डिझाइन व हायड्रॉलिक डिझाइन नैना अभियांत्रिकी विभागाकडे मागितले असता त्यांनी गटाराचे डिझाइन उपलब्ध करुन दिले पण, ज्या हायड्रॉलिक डिझाइनवर पावसाळी गटारांचे डिझाइन बनवले ते हायड्रॉलिक डिझाइन उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांना कळविले आहे. हायड्रॉलिक डिझाइनच्या नावाखाली सिडकोचा नोडल प्लॅन देवून थट्टा करण्यात आली आहे. वास्तविक पाहता, हायड्रॉलिक डिझाइनशिवाय कुठल्याही पावसाळी गटाराचे आराखने बनवता येत नाहीत. परंतु, सल्लागार मे.हितेन सेठी ॲण्ड असोसिएट्स यांनी सिडकोला दिलेले गटाराचे डिझाइन हे महाभयंकर असून त्याला नैना विभागाने नियोजन विभागाकडून पडताळणी केलेली नाही.
सल्लागार हितेन सेठी यांनी प्रिकास्ट पावसाळी गटारे जरी सदर कामांमध्ये अंतर्भुत केली असली तरी त्याचा खर्च हा सर्वसाधारण पावसाळी गटारे बांधण्याच्या खर्चाच्या दिडपट आहे. आधीच सिडकोची आर्थिक हालत हलाखीची असताना हितेन सेठी यांनी अशाप्रकारची गटारे अंतर्भुत करणे हे सिडकोला अजुन दिवाळखोरीत ढकलणारे असल्याची चर्चा सध्या सिडकोत आहे. त्यामुळे हितेन सेठी यांनी दिलेले प्रिकास्ट गटाराचे डिझाइन रद्द करुन ते सिडकोच्या नियोजन विभागामार्फत बनवून घेण्याची मागणी सध्या होवू लागली आहे.
सिडकोकडे स्वतःचे नियोजन व डिझाइन विभाग असताना आणि संपुर्ण नवी मुंबई, छत्रपतीसंभाजीनगर सारख्या शहरांच्या नियोजनाचा अनुभव गाठीशी असताना 425 कोटी रुपये खर्च करुन सल्लागार नेमणे हे काम बाह्य शक्तींच्या दबावाखाली झालेले आहे. असाच 750 कोटी रुपये मोजून घरे विकण्यासाठी एक सल्लागार सिडकोने नेमला आहे. त्यामुळे सिडकोचा कारभार आता चालवण्यासाठी अजून एक सल्लागार नेमणे तेवढे बाकी आहे. -संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
ठेकेदारांना दिलेली कामे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे