Breaking News
इमारतींच्या खाली ट्रक टर्मिनल असल्याबाबत हजारो खरेदीदार अनभिज्ञ
नवी मुंबई ः सिडकोने हजारो कोटी रुपये खर्च करुन वाशी येथील ट्रक टर्मिनल भुखंडावर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3131 घरे बांधून त्याची सोडतही काढली आहे. परंतु, या इमारतीखाली एपीएमसी बाजारात येणारे शेकडो ट्रक पार्किंग केले जातील व त्यांची देखभाल दुरुस्ती केली जाईल याबाबत सिडकोने कोणतीही माहिती ग्राहकांना दिली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेकांनी या कारणाने घरे रद्द केल्याचे उघडकीस आल्याने सिडकोने ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप अनेक लाभार्थ्यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना केला आहे.
सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 67 हजार घरे बांधण्याचे शिवधनुष्य उचलले असून वाशी, सानपाडा, जुईनगर, खारघर, कामोठे व नवीन पनवेल नोडमध्ये ही घरे बांधण्यात येणार आहेत. वाशीमधील गृहप्रकल्प हा एपीएमसीसाठी राखीव असलेल्या ट्रक टर्मिनल भुखंडावर तर नवीन पनवेल मधील गृहप्रकल्प बस स्थानकाच्या भुखंडावर उभारण्यात येत आहे. सिडकोने वाशीमधील घरांच्या किंमती सूमारे 70 ते 80 लाखांच्या घरात निर्धारित केल्या असून त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर सिडको देत असलेले क्षेत्र हे पुव वितरीत केलेल्या घरांच्या क्षेत्रापेक्षा कमी असल्याचे अनेक लाभाथचे म्हणणे आहे. सिडकोने केलेल्या जाहीरातीत सदर इमारतींखाली ट्रक टर्मिनल असल्याचे कुठेही नमुद केले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. सिडकोने या इमारतींखाली एपीएमसीमध्ये येणाऱ्या गाड्यांचे पार्किंग व त्यांची देखभाल दुरुस्ती प्रस्तावित केली आहे. या गृहसंकुलात दररोज शेकडो अवजड वाहनांची वर्दळ होणार असून त्यामुळे तेथे निर्माण होणाऱ्या वायु प्रदुषणास व ध्वनी प्रदुषणास तेथे राहणाऱ्या रहिवाशांना सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक भागातून येणाऱ्या ट्रक व अवजड वाहनांमुळे स्थानिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. त्यामुळे हे लक्षात येताच काही लाभार्थ्यांनी घरे नको असल्याचा प्रस्ताव सिडकोला दिल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून कळत आहे. याबाबत माहिती व जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन आपणांस अवगत करतो असे सांगण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai