Breaking News
सोसायटी कमिटीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मुंबई ः नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील हाऊसफिन (कलश उद्यान) को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत 6 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका विशेष लेखा परिक्षक वर्ग-2 विजय पाखले यांनी आपल्या सन 2010 ते 2021 या लेखापरिक्षण अहवालात ठेवला आहे. या अहवालाची दखल घेत सहनिंबधक सहकारी संस्था, नवी मुंबई यांनी विशेष लेखा परिक्षक यु.जी.अहिरे यांना गैरव्यवहार व अपहारास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश देऊन चार महिने उलटले तरी गुन्हा दाखल न केल्याने या दिरंगाईबद्दल तक्रारदार मधुमालती डफरे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सिडकोने कृषी उत्पन्न बाजार समितीतील सदस्यांना कोपरखैरणे येथे सेक्टर 11 मध्ये भुखंड क्र. 23 हा हाऊसफिन को.ऑप.हाऊसिंग सोसायटी या नावाने वितरीत केला होता. नवी मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर राम विचारे यांनी सदर भुखंडावर मोठे गृहसंकुल उभारले व ते कलश उद्यान या नावाने ओळखले जाते. या गृहसंकुलात नवी मुंबईतील अनेक राजकीय नेत्यांच्या सदनिका आहेत. सदर कलश उद्यान सोसायटीचे लेखापरिक्षण झाले नाही तसेच कमिटी सदस्यांनी अनेक प्रकारे मनमानी कारभार केल्याची तक्रार सदस्य मधुमालती डफरे, केवल कंटेकर, प्रदिप ताम्हाणे व इतरांनी सहनिंबधक, सहकारी संस्था सिडको, नवी मुंबई यांचेकडे केली होती. या तक्रारीत लेखापरिक्षण केलेले ताळेबंद वार्षिक सभेसमोर सादर न करणे, ठराविक सभासदांना व्याज व देखभाल खर्चामध्ये सूट देणे, तसेच संस्थेने दाखल केलेले केसेस परस्पर मागे घेणे अशाप्रकारचे गंभीर आरोप केले होते. सहनिंबधक सहकारी संस्था यांनी याबाबतचे विशेष लेखापरिक्षण करण्याचे आदेश विशेष लेखापरिक्षक वर्ग-2 विजय पाखले यांना दिले होते. पाखले यांनी संस्थेचे लेखापरिक्षण करुन आपला अहवाल मार्च 2023 मध्ये सहनिंबधक सहकारी संस्था यांना सादर केला. या लेखापरिक्षण अहवालात समिती सदस्य, प्रशासक तसेच लेखापरिक्षक एस.पी.पाटील ॲण्ड असोसिएट्स व एस.एम.अमेरिया यांना सूमारे 6 कोटी 99 हजार रुपयांच्या नुकसानीस जबाबदार धरुन सदर रक्कम त्यांचेकडून वसूल करण्यासाठी सहनिंबधकांकडे शिफारस केली आहे.
कमिटी सदस्यांनी या लेखा परिक्षण अहवालास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये सहकार मंत्री यांचेसमोर पुनरिक्षणाचा अर्ज केला असता त्यास सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली. या आदेशाविरुद्ध मधुमालती डफरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले. न्यायालयाने डफरे यांच्या बाजुने निकाल देत सहकार मंत्री यांचे आदेश रद्द केले. या आदेशानंतर सहनिंबधक सहकारी संस्था सिडको नवी मुंबई यांनी हाऊसफिन को ऑप.सोसायटीच्या (कलश उद्यान) कमिटी सदस्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश लेखा परिक्षक यु.जी.अहिरे यांना दिले आहेत. सदर आदेश देऊन सहा महिने उलटुन गेले असले तरी अहिरे यांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. अहिरे यांच्यावर स्थानिक राजकीय पुढारी दबाव आणत असल्याने गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याचा आरोप तक्रारदार मधुमालती डफरे यांनी केला आहे. दरम्यान, लेखा परिक्षक यु.जी.अहिरे यांनी गुन्हा दाखल न केल्यास आपण पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात दाद मागु अशी प्रतिक्रिया डफरे यांनी दिली आहे.
कलश उद्यान संकुलात कमिटीतर्फे अनेक बेकायदेशीर कामे झालेली आहेत. 370 सदनिका असलेल्या या संकुलात अनेक लोकांची घरे अजुनपर्यंत त्यांच्या वारसांच्या नावे झालेली नाहीत. ज्या संस्थेत एवढा मोठा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे, त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर राजकीय दबावापोटी कारवाई होण्यास अडथळा येत आहे. - मधुमालती डफरे, तक्रारदार
अहवालातील मुद्दे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai