Breaking News
नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डी.वाय.पाटील क्लायमेट ॲक्शन लॅबच्या वतीने आयोजित ‘ग्रीन मॅरेथॉन : रन फॉर द प्लॅनेट’ या पर्यावरणपूरक उपक्रमात नवी मुंबई महापालिकेने आयोजन सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला. पर्यावरणासंबंधीत घोषवाक्यांचे फलक उंचावत या ग्रीन मॅरेथॉनमध्ये 200 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
पालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यावषच्या ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन’ या जागतिक पर्यावरणदिनाच्या संकल्पेनेला अनुसरून पर्यावरण सप्ताह साजरा केला जात आहे. या अंतर्गत नानाविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून त्यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे विविध संस्थांमार्फत आयोजित पर्यावरणशील उपक्रमांतही पालिका सहभागी होत आहे. डॉ.डी.वाय.पाटील समुहाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार डी.वाय.पाटील क्लायमेट ॲक्शन लॅबमार्फत डॉ.डी.वाय.पाटील स्टेडिअमपासून सुरू झालेल्या व नेरूळ पूर्व परिसरात निश्चित केलेल्या मार्गाने पुन्हा स्टेडिअमजवळ सांगता झालेल्या 5 किमी. अंतराच्या ग्रीन मॅरेथॉनमध्ये युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालिकेच्या वतीने उद्यान विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, विजय पाटील स्कुल ऑफ मॅनेजमेंटच्या कॉर्पोरेट रिलेशन मॅनेजर डॉ.विद्या श्रीनिवास यांनी झेंडा दाखवून ग्रीन मॅरेथॉनचा शुभारंभ केला. नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त जयंत जावडेकर यांनी ग्रीन मॅरेथॉनमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
‘पर्यावरण विघातक प्लास्टिकला नकार आणि कापडी पिशव्यांचा करू स्विकार’, ‘से नो टू प्लास्टिक’, ‘प्लास्टिकचा वापर टाळूया पर्यावरण जपूया’ अशा घोषवाक्यांचे फलक उंचावत या ग्रीन मॅरेथॉनमध्ये 200 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती. या ग्रीन मॅरेथॉनमधील विजेत्यांना सन्मानचिन्हे व मेडल्स देऊन गौरविण्यात आले. या माध्यमातून शाश्वत पर्यावरण विकासासाठी एक यशस्वी धाव घेण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai