Breaking News
नवी मुंबई ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई पालिकेच्या वतीने जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचे निर्मूलन या संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी जाहीर केलेल्या संकल्पनेनुसार 22 मे ते 5 जून 2025 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमे अंतर्गत प्लास्टिक पिशव्या वापरु नये या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली व प्लास्टिकला पर्यायी कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व श्री. संतोष वारुळे तसेच परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व डॉ. कैलास गायकवाड यांच्या माध्यमातून विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त आणि त्यांचा अधिकारी - कर्मचारीवृंद यांच्या वतीने कापडी पिशव्या वाटपाचा वेगळा उपक्रम सर्व विभागांमध्ये राबविण्यात आला. यामध्ये बेलापूर विभागात दिवाळे मच्छी मार्केट, नेरुळ विभागात से.29 दैनंदिन बाजार, वाशी विभागात से.9 मार्केट, तुर्भे विभागात चाईल्ड लाईफ स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने एपीएमसी मार्केट व तुर्भे स्टोअर बुध्दविहार परिसर, कोपरखैरणे विभागात से.8 येथील भाजीपाला, मटण व फिश मार्केट, घणसोली विभागात से.4 हावरे चौक मार्केट व ऐरोली विभागात से.5 जय भवानी मार्केट या ठिकाणी प्रतिबंधात्मक प्लास्टिक न वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच कापडी पिशव्यांचे वाटप मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिकांना करण्यात आले.
वाशी विभागातील उपक्रमात विशेष म्हणजे तृतीयपंथी नागरिकांनी प्लास्टिकला नकार मोहीमेत सक्रिय सहभागी घेतला. सेक्टर 9 येथील भाजी मार्केटमध्ये त्यांनी दुकानदार व नागरिकांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांना कापडी पिशव्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या उपक्रम आयोजनात लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख रिचा समित तसेच किन्नर मां सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai