ज्वेल ऑफ नवी मुंबईत उभारणार गौतम बुद्धांचा पुतळा!

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या पाठपुराव्याला यश 

नवी मुंबई : पालिकेच्या वतीने पाम बीच मार्गाजवळ नेरूळमध्ये ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ हा निसर्गरम्य परिसर साकारण्यात आला आहे. हे उद्यान नवी मुंबईकरांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. लवकरच येथे भगवान गौतम बुद्धांचा 30 फूट उंचीचा व 6 टन वजनाचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा उभारण्यात येणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. 

अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचा 30 फूट उंचीचा व 6 टन वजनाचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे उभारण्यात यावा यासाठी बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी महाराष्ट्र सरकारकडे जुलै 2019 मध्ये पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, लवकरच भगवान गौतम बुद्धांचा पुतळा ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानात उभारण्यात येईल. भगवान गौतम बुद्धांच्या अष्टांग मार्गावर चालणार्‍या तमाम आंबेडकरी अनुयायी आणि त्यांच्या चळवळीला या पुतळयाच्या उभारणीने नक्कीच नवी ऊर्जा मिळणार आहे.      

बेलापूरच्या आ.मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश आल्याने त्यांचे विविध स्तरातून आणि आंबेडकरी अनुयायांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.