शासकीय जमिनीवरील बांधकाम वादात
- by संजयकुमार सुर्वे
- Jul 04, 2025
- 435
परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
नवी मुंबई ः नेरुळ सेक्टर 27 मधील सर्वे नं. 286/12 व 286/14 भूखंडावर नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागाने दिलेली बांधकाम परवानगी वादात सापडली आहे. सदर जमिन ही 1972 साली शासनाकडे वर्ग झाली असताना तिची नोंद गावाच्या दफ्तरी घेतली असली तरी 7/12 उताऱ्यावर त्याची नोंद न आल्याने सदर बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. ही निमयबाह्य व बेकायदेशीर परवानगी देणाऱ्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी सरकारकडे केली आहे.
मौजे शहाबाज, बेलापुर येथील सर्वे नं. 286/12, 286/13, व 286/14 या जमिनी भास्कर महादु पाटील यांच्याकडे मुलकीपाटीलकी वतन जमिनी कब्जे हक्क्काने होत्या. सदर जमिनीचा धारा संबंधित शेतकऱ्याने भरला नसल्याने सदर जमिनी 1972 साली फेरफार नं. 2766 अन्वये वर्ग करण्यात येऊन त्याची नोंद गावचे दफ्तरी घेण्यात आली. परंतु, या फेरफाराच्या अनुषंगाने 7/12 उताऱ्यावर सदर नोंद न घेतल्याने कागदावर सदर जमिन भास्कर महादु पाटील यांचेच नावे राहिली.
नवी मुंबई महापालिकेने 2022 साली सदर भूखंडावर त्यावेळचे मालक मे. साई इन्फ्रास्ट्रक्चर यांना बांधकाम परवानगी दिली. त्यानंतर विकासकाने बांधकाम पुर्ण केल्यावर भोगवटा प्रमाणपत्रही बहाल करण्यात आले. ही बांधकाम परवानगी नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी राज्य सरकारकडे करुन चौकशीअंती संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश होऊनही जिल्हाधिकारी, ठाणे कार्यालयाने याबाबत कोणताही समयोचित निर्णय न घेतल्याने 2016 पासून जिल्हाधिकारी पद भुषवणाऱ्या सर्व जिल्हाधिकारी यांचीही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. त्याचबरोबर या शासकीय भूखंडावर नियमबाह्य बांधकाम परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली असून शासन याबाबत कोणता निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
2022 साली 7/12 उताऱ्यावर असलेली जमिनीची मालकी आणि मुख्य भूमी अभिलेख, जिल्हा ठाणे, यांनी दिलेला मोजणी नकाशा विचारात घेऊन नवी मुंबई महापालिकेने बांधकाम परवानगी संबंधित गृहप्रकल्पाला दिलेली आहे. दिलेली बांधकाम परवानगी ही नियमानुसार आहे. - सोमनाथ केकाण, सहायक संचालक, नगररचना, नमुमंपा
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे