माझे घर पसंतीचे बांधकाम दर सिडकोच्या मनमर्जीचे
- by संजयकुमार सुर्वे
- Jul 11, 2025
- 589
9000 रु.प्रति चौ.फुट; सिडकोचा बांधकाम दर रेडिरेकनरच्या चौपट
नवी मुंबई ः विधानसभेच्या चालु अधिवेशनात नवी मुंबईत सिडको बांधत असलेल्या पीएम आवास योजनेतील घरांचे दर कमी करावेत म्हणून आमदारांनी आवाज उठवला आहे. परंतु, घरांची विक्री करताना सिडकोने घरांचा बांधकाम खर्च सरासरी 9000 रुपये प्रति चौ.फुट धरुन घरांची किंमत निश्चित केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकार अंतर्गत उघडकीस आली आहे. शासनाचे बांधकामाचे रेडिरेकनर दर हे 2600 ते 2700 प्रति चौ.फु असताना सिडकोचे दर चौपट असल्याने हा गरिबांच्या पुंजीवर डल्ला असल्याची प्रतिक्रिया अनेक लाभार्थ्यांनी दिली आहे. त्यामुळे सरकार सिडकोला दरांबाबत कोणते आदेश देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिडकोने नवी मुंबईतील विविध नोडमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 65 हजार घरांचे बांधकाम हाती घेतले आहे. यापुर्वी 15000 घरांचे बांधकाम सिडकोने करुन ती घरे लाभार्थ्यांना वितरीत केली आहेत. या घरांचे दर 16 ते 18 लाखांदरम्यान असल्याने या घरांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ही घरे आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी बांधण्यात आली असून त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रति सदनिका 2.50 लाखांचे अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे.
2019 साली तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी 65 हजार घरे बांधण्याचे जाहीर करुन त्याबाबतचे 20 हजार कोटींचे कार्यादेश चार कंत्राटदारांना देण्यात आले आहे. ही घरे वाशी, जुईनगर, तळोजा, खारघर, बामनडोंगरी, कळंबोली, खांदेश्वर, नविन पनवेल, खारकोपर येथे बांधण्यात येत आहेत. या घरांच्या विक्रिसाठी सिडकोने 700 कोटी रुपयांचा दलाल नेमला आहे. या दलालाने 12 जुलै 2023 रोजी घरांची किंमत काय असावी याबाबतचा विस्तृत अहवाल सिडकोच्या पणन विभागाला दिला आहे.
सिडकोने दलालाच्या प्रस्तावावरुन सुरुवातीला 14 हजार घरांची विक्रि करण्यासाठी काढलेल्या जाहीरातीत घरांची किमंत 35 लाख रुपये ठेवण्यात आली होती. परंतु, त्यावेळी झालेल्या आंदोलनानंतर घरांची किंमत 10 लाखाने कमी करण्यात आली. नुकतीच सिडकोने 26 हजार घरांची सोडत काढली असून त्यामध्ये घरांच्या किमंती या 36 लाखांपासून 74 लाखांपर्यंत निर्धारित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किंमती कशापद्धतीने निर्धारित करण्यात आल्या आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी माहिती अधिकारात माहिती घेतली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सिडकोने जवळजवळ सर्वच नोडमधील योजनांमध्ये घराच्या बांधकामाचा खर्च सरासरी 9000 रुपये प्रति चौ.फुट ठेवला आहे. हा दर आज राज्यात कुठेही नसून अतिशय उच्च दर्जाच्या सेवा व सुविधा पुरविण्यात आल्या असल्या तरी हा दर शक्य नसल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. याउलट शासनाचे तळोजा, खांदेश्वर, वाशी, जुईनगर, नवीन पनवेल येथील रेडिरेकनर बांधकाम दर हे 2600 ते 2700 प्रति चौ.फुट आहेत.
सल्लागाराने दिलेल्या दरांमध्ये 12 टक्क्के गुंतवणुकीवरील व्याज तसेच 5 टक्के अधिकतर खर्च आणि 25 टक्के आरक्षित जमिनीची किंमत तसेच 577 रुपये चौ.फुट विक्रिचा खर्च गृहित धरुन घरांच्या किंमती निश्चित केल्या आहेत. सिडकोने गृहित धरलेला 9000 रुपये प्रति. चौ.फुट बांधकाम खर्च घरांच्या किंमती वाढवणारा आहे. सिडकोने चारही कंत्राटदारांना 2700 ते 2800 प्रति चौ. फुट दराने कंत्राट दिले असून सिडको जर हा खर्च तिप्पटीने वसूल करणार असेल तर गरिबांच्या पुंजीवर सिडकोने मारलेला डल्ला आहे अशी प्रतिक्रिया सुर्वे यांनी दिली आहे. सिडकोने तातडीने याबाबत निर्णय घेऊन लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत आपण लवकरच पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष सिडकोच्या या लुटीबाबत वेधणार असल्याचे सांगितले. याबाबत सिडको व्यवस्थापकीय संचालक, सह व्यवस्थापकीय संचालक यांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ईमेलद्वारे संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
- घरांची किमंत 35 लाखांऐवजी 74 लाख रु.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वाशी येथील ट्रक टर्मिनल भूखंडावर सिडको 3100 घरे बांधत आहे. या घरांच्या विक्रिसाठी सल्लागाराने 35.26 लाख रुपये किंमत सिडकोला सूचवली आहे. परंतु, सिडकोने काढलेल्या सोडतीत सदर घरांची किंमत ही 74 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांची किंमत 74 लाख रुपये कोणत्या निकषाच्या आधारावर ठरवण्यात आली हा संशोधनाचा विषय आहे. - प्रति.चौ.फुटामागे 577 रु. दलाली
सिडकोने 65 हजार घरांच्या विक्रिसाठी मे. हॉलिओस मिडियम बाजार प्रा.लि. व थॉटट्रेन्स डिझाइन प्रा. लि. या जॉईंट व्हेंचरला सल्लागार म्हणून नेमले आहे. हे कंत्राट 700 कोटींना दिले असून आतापर्यंत सिडकोने 118 कोटी रुपये संबंधित सल्लागाराला दिले आहेत. सल्लागाराने सदर घरांची विक्रिची किंमत ठरवताना त्यामध्ये मार्केटिंग आणि ब्रॅण्डींगसाठी 577 रु. चौ.फुट दर आकारला आहे. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त असून सरकार राजकीय दबावापोटी दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
बांधकामाचे दर सन 2025-26
स्थळ सिडको रू.प्र.चौ.फु शासन रू.प्र.चौ.फु
खांदेश्वर 9730 2596
खारघर 9385 2596
कळंबोली 9614 2596
तळोजा 8259 2596
मानसरोवर 9708 2596
वाशी 8945 2596
खारकोपर 11760 2338
जुईनगर 9701 2596
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे