Breaking News
सिडकोची भारतीय स्पर्धा कायदा व शासन निर्णयाला तिलांजली
नवी मुंबई ः शासनाने नैना क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून स्थानिक लोकांचा विरोध झिडकारुन 12 नगरविकास परियोजना मंजूर केल्या आहेत. या परियोजनांत सिडकोने हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा काढल्या आहेत. सदर निविदा ठराविक ठेकेदारांनी आपापसात वाटून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी शासनाकडे तक्रार केली असून शासन कोणता निर्णय घेते याकडे आता सिडकोचे लक्ष लागले आहे.
सिडकोने नैना क्षेत्राचा विकास होण्यासाठी सूमारे 6 हजार कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया निवडणुकीपुव ऑगस्ट 2024 मध्ये राबवली होती. यामध्ये 8 निविदा या सूमारे रु. 1575 कोटींच्या असून 2 निविदा या 5 हजार कोटींच्या आहेत. एक काम मे. एल ॲण्ड टि लि. यांना देण्यात आले असून त्याचे मुल्य सूमारे 2568 कोटींचे असून दुसरे काम पीएनसी-अक्षया जॉईंट व्हेंचर यांना देण्यात आले असून त्याचे मुल्य 2012 कोटींचे आहे. उर्वरित 8 कामे ही मे.जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि., मे. ठाकुर इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि., मे पी.पी.खारपाटील कंस्ट्रक्शन प्रा.लि., मे. अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., मे. पी.डी.इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. यांना देण्यात आली आहे. या निविदांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता सदर निविदाकारांनी निविदा आपापसात वाटुन घेतल्या असल्याचे दिसत असून दर सुद्ध अव्वाच्या सव्वा भरले आहेत.
यामध्ये नैना-2 येथील निविदा क्र. 3 मध्ये 158 कोटींच्या कामात मे पी.पी.खारपाटील कंस्ट्रक्शन प्रा.लि. यांनी निविदा रक्कमेच्या +36.999% दर भरले आहेत तर दुसऱ्या क्रमांकाचे मे.पी.डी.इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. यांनी +40.320% दर भरले आहेत. त्याचवेळी निविदा क्र. 4 मध्ये 156 कोटींच्या कामात मे.पी.डी.इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. यांनी निविदा रक्कमेच्या +36.320 दर भरले आहेत तर दुसऱ्या क्रमांकाचे मे पी.पी.खारपाटील कंस्ट्रक्शन प्रा.लि. यांनी +41.499% दर भरले आहेत. म्हणजेच या दोन्ही ठेकेदारांनी ही दोन्ही कामे वाटुन घेतल्याचे त्यांनी भरलेल्या निविदा रक्कमेवरुन दिसत आहे. निविदा क्र. 5 व 6 मध्ये मे.अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी रु. 117 व रु. 140 कोटींच्या कामात निविदा रक्कमेच्या +33.33%व +32.32% अनुक्रमे दर भरले आहेत. या दोन्ही कामात मे.ठाकुर इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. यांनी निविदा रक्कमेच्या +46.00% व +41.00% दर तर मे.जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. यांनी निविदा रक्कमेच्या +40.83% व +40.83% दर भरले आहेत. म्हणजेच मे.ठाकुर इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. व मे.जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. यांनी ही कामे मे.अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना मिळावीत म्हणून चढ्या दराने दर भरले आहेत. याउलट निविदा क्र. 6 मध्ये 286 कोटींच्या कामात मे.जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. यांनी निविदा रक्कमेच्या +37.50 टक्के दर भरले असून दुसऱ्या क्रमांकाचे दर मे. ठाकुर इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. यांनी +39.00% दर भरले असून तिसऱ्या क्रमांकाचे दर मे.अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी +41.40% दर भरले आहेत. यावरुन हे काम मे.जे.एम. म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. यांना देण्यासाठी मे.ठाकुर इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. व मे. अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी जाणिवपुर्वक जास्त दर भरल्याचे दिसत आहे. निविदा क्र. 7 व 8 मध्ये 377 कोटी व रु. 156 कोटींच्या कामात मे. ठाकुर इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. यांनी +38.50%व +38.00% दर अनुक्रमे भरले आहेत. या दोन्ही कामात मे.जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. यांनी निविदा रक्कमेच्या +40.83% व +43.83% दर भरले आहेत. यावरुन मे.जे.एम.म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. यांना हव्या असलेल्या निविदांमध्ये त्यांनी 37.50% दर भरले आणि नको असलेल्या कामात 43.83% दर भरल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शासनाच्या 11 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासननिर्णयात, ज्या निविदा या निविदा रक्कमेपेक्षा 10% अधिक दराने आल्या असतील अशावेळी ठेकेदारांसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड न करता त्या तात्काळ रद्द करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी असे स्पष्ट निर्देश आहेत. त्याचबरोबर निविदेमध्ये जर जाचक अटी असतील तर व्यापक स्पर्धेसाठी त्या शिथील करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी असेही नमुद आहे. असे असतानाही सिडकोने शासननिर्णय धाब्यावर बसवून निवडणुकीच्या तोंडावर ठेकेदारांशी तडजोड करुन सदर निविदा संबंधित ठेकेदारांना बहाल केल्या. सदर निविदा प्रक्रिया ही भारतीय स्पर्धा कायद्याचे कलम 3(1)(ड) चे स्पष्ट उल्लंघन करणारे असून अशा निविदा तात्काळ रद्द करण्याचे निर्देश राष्ट्रीय स्पर्धा आयोगाचे आहेत. याही निर्देशांना सिडकोने हरताळ फासून संबंधित निविदा ठेकेदारांना बहाल केल्या. सिडकोने संपुर्ण निविदाकारांशी वाटाघाटी करुन प्रत्येक निविदाकाराकडून सरासरी 30% सूट घेतली. या निविदा प्रक्रियेबाबत सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून संपुर्ण निविदा प्रक्रिया रद्द करुन संबंधित ठेकेदारांना ठराविक कालावधीसाठी सिडकोत निविदा भरण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास आपण राष्ट्रीय स्पर्धा आयोगाकडे याबाबत लवकरच याचिका दाखल करु अशी प्रतिक्रिया सुर्वे यांनी ‘आजची नवी मुंबई’ शी बोलताना दिली.
नैना क्षेत्रात सिडकोने राबवलेली निविदा प्रक्रिया ही पुर्णतः ठेकेदारांनी संगनमताने हायजॅक केल्याचे दिसत आहे. सर्वांनी मिळून सदर कामे वाटुन घेतली आहेत. याबाबत शासनाकडे व सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे तक्रार केली आहे. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता व स्पर्धात्मकतेची कमतरता प्रखरतेने आढळून येत आहे. संबंधित प्राधिकाऱ्यांनी यासंदर्भात योग्य ती दखल घेऊन कारवाई न केल्यास याबाबत राष्ट्रीय स्पर्धा आयोगाकडे दाद मागण्याची तयारी केली आहे. - संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे