Breaking News
भाडेपट्ट्यात दुटप्पी धोरण; राजकर्त्यांच्या संस्थांना पालिकेचे अभय
नवी मुंबई : सिडको काळापासून नवी मुंबईत साहित्य, संस्कृती, कला जोपासणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना महात्मा जोतिबा फुले स्मृतिभवनातील जागा तात्काळ खाली करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. परंतु, दुसरीकडे नवी मुंबई शहरातील राजकर्त्यांच्या संस्थांच्या अधिपत्याखालील झुणका भाकर केंद्रांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपून 5 वर्षे उलटली तरीही त्यांना मात्र अभय दिल्याने पालिकेच्या दुटप्पी धोरणाविरुद्ध शहरातील साहित्य, कला, संस्कृतीसाठी धडपडणाऱ्या विविध संस्था आणि साहित्यिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नवी मुंबई शहराची नव्याने निर्मिती होत असताना शहरात साहित्य, कला व संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून सिडकोने अनेक सामाजिक संघटनांना शहरातील अनेक समाजमंदिरे सवलतीच्या दरात भाड्याने दिली होती. त्यामध्ये वाशीतील समाजमंदिरात अनेक सामाजिक संघटनांना सिडकोने राजाश्रय दिला होता. त्यामध्ये टाऊन लायब्ररी, नूतन महिला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, न्यू बॉम्बे म्युझिक अँड ड्रामा सर्कल, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, नवी मुंबई स्पोर्टस क्लब, अलर्ट इंडिया अशा विविध संस्थांचा समावेश होता. स्त्री मुक्ती संघटना, न्यु बाँम्बे म्युझिक अँड ड्रामा सर्कल यांचे काम सर्वश्रुत असून या संघटनांच्या प्रयत्नाने नवी मुंबईच्या सामाजिक जडणघडणीला व संस्कृतीला वेगळे वळण मिळाले.
नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आल्यानंतर नवी मुंबई शहरातील अनेक समाजमंदिरे व सामाजिक सेवा-सुविधांसाठी बांधण्यात आलेल्या इमारती आपल्या अधिपत्याखाली राहाव्यात म्हणून स्थानिक पुढाऱ्यांचा आटापिटा सुरु आहे. आज शहरातील अनेक सामाजिक इमारती या राजकीय पुढाऱ्यांच्या संस्थांना पालिकेने कवडीमोल भाडेपट्ट्याने आंदण दिल्या आहेत. त्यासाठी पालिकेच्या नगरसेवकांनी 2016 मध्ये सदर जागा शासन दराच्या 2 टक्के दराने भाड्याने देण्याचे धोरण मंजुर केले. या राजकीय पुढाऱ्यांनी सदर जागा पोटभाडेकरुंना देेवून स्वतःचे चांगभलं केले आहे. या राजकीय पुढाऱ्यांच्या संस्थांना जागा खाली करण्याच्या नोटीसा देण्याची हिम्मत पालिकेच्या मालमत्ता विभागाने दाखवावी अशी मागणी अनेक सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
नवी मुंबई शहरातील राजकीय पुढाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी झुणका भाकर केंद्रे शिवसेना-भाजप सरकारच्या काळात वितरीत करण्यात आली होती. ही केंद्रे नंतर पालिकेने ताब्यात घ्यावीत असे शासनाने आदेश पारित केले होते. परंतु, राजकीय पुढाऱ्यांचे हित जपण्यासाठी महापालिकेने 16 झुणका भाकर केंद्रांच्या जागी इतर आहार योजना मंजुर करुन ती पुन्हा राजकीय पुढाऱ्यांच्या संस्थांना देण्यात आली आहेत. त्यामध्ये गणेशकृपा मित्र मंडळ-अध्यक्ष भरत नखाते, शिवाई महिला विकास मंडळ- अध्यक्षा मंदाकिनी मोरेश्वर म्हात्रे, शिवशाही व्यायाम मंडळ- अध्यक्ष सुरेश सालदार, आशा निवृत्ती कापडणे तसेच शिवाई औद्योगिक महिला संस्था अध्यक्ष - अरुणा तानाजी भोईर यांसह अनेक संस्थांचा समावेश आहे. या संस्थांना डिसेंबर 2016 मध्ये पाच वर्षांसाठी जागा वाटप केले होते. परंतु, आज 2025 उगवले तरी मालमत्ता विभागाने कोणत्याही प्रकारच्या जागा खाली करण्याच्या नोटीसा दिलेल्या नाहीत.
कोणतेही राजकीय आश्रय नसलेल्या व समाज भान जपून सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांना मात्र मालमत्ता विभागाने जागा खाली करण्याच्या नोटीसा पाठवल्याने सामाजिक संघटनांपुढे धर्मसंकट उभे राहिले आहे. त्यांनी पालिका आयुक्तांसह स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे दरवाजे ठोठावले असून कायद्यावर बोट ठेवून त्यांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या या दुटप्पी धोरणामुळे शहरातील साहित्य, कला, संस्कृतीसाठी धडपडणाऱ्या विविध संस्था आणि साहित्यिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका आयुक्तांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा व नवी मुंबईच्या जडणघडणीत आपले योगदान देणाऱ्या संस्थांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वदूर होत आहे. याबाबत मालमत्ता विभागाचे अधिकारी अहिरे यांच्याशी संपर्क केला असता आपण माहिती घेवून आपणांस कळवतो असे सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai